गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराबाहेर हात पसरून भीक मागणाऱ्या वृद्धेनं तेच हात खुले करत मंदिराच्या व्यवस्थापनाला १० हजार रुपयांचं दान करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे वाचून कदाचित तुमचे डोळेच फिरतील. या भिकारी महिलेनं हे पहिल्यांदा दान केलंय, असंही नाही. यापूर्वी सुद्धा या भिकारी महिलेने २०१९ मध्ये मंदिराबाहेर भीक मागून जमा केलेले पैसे मंदिराला दान केले होते. तिच्या या दानशूरतेचं भाविकांना अप्रूप वाटतंय. अनेक जण तर मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर या आजीबाईंचेही आशीर्वाद घेत आहेत. प्रत्येकजण आता या आजीबाईंसोबत सेल्फी काढत सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहेत. त्यामूळे ही आजीबाई सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आलीय.
‘दाता भवति वा न वा’, या संस्कृतमधील एका सुभाषिताप्रमाणेच आजच्या काळात बहुतांश मंडळी ‘मी आणि माझं’ यातच रमलेली दिसून येते. पण या कोषात अडकलेल्या आजच्या पिढीसमोर या भिकारी महिलेने नवा आदर्श उभा केलाय. या वयोवृद्ध भिकारी महिलेचे नाव केम्पम्मा असं असून त्या ६५ वर्षाच्या आहेत. कर्नाटकमधल्या चिक्कमगालुरू जिल्ह्यातील कदूर शहरातल्या पतला अंजनेय मंदिरासमोर या आजीबाई भीक मागून आपलं पोट भरवीत असतात. या आजीबाई शुक्रवारी अचानक पथला अंजनेय मंदिराच्या पुजाऱ्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण त्यानंतर तिच्या भेटीचं कारण सजल्यानंतर सर्वांचेच डोळे विस्फारून गेले. मंदिराबाहेर बसून भीक मागणारी महिला मंदिराला १० हजार रूपयांचं दान करण्यासाठी आलीय, यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता.
ही महिला भिकारी हातात त्याला ५०० रुपयांच्या २० नोटा घेऊन मंदिराच्या पुजाऱ्याकडे दान करण्यासाठी आली होती. पतला अंजनेय स्वामींवर या भिकारी महिलेची श्रद्धा आहे. पतला अंजनेय स्वामींच्या मंदिराच्या गोपुरम (कळस) साठी चांदीचे आवरण करावं अशी या महिला भिकारीची इच्छा आहे. यासाठीच तिने मंदिराबाहेर बसून वर्षानुवर्षे भीक मागत पोटापुरते पैसे बाजूला काढून उर्वरित रक्कम जमा करण्यास सुरूवात केली. असं करत करत या आजीबाईंकडे बघता बघता १० रूपयांची रक्कम जमा झाली. ही रक्कम अंजनेय स्वामींच्या मंदिराला दान करण्याचा निर्णय या आजीबाईंनी घेतला. या पैशांचा विनियोग मंदिराला गोपुरमला (कळस) चांदीचं आवरण करण्यात यावं, अशी या दानी आजीची इच्छा आहे.
त्यानंतर या आजीबाईंच्या त्यांच्या दानशूरपणाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. रस्त्यावर भीक मागून जमा केलेली रक्कम मंदिराला दान करण्याच्या निर्णयामुळे सगळीकडे त्यांची चर्चा होऊ लागली. त्यानंतर या आजीबाई ‘केम्पाजी’ नावाने ओळखू लागल्या. सहसा या आजीबाई कदूर साईबाबा मंदिराच्या बाहेर दिसतात. त्या मंदिराबाहेर किंवा जवळच्या बस टर्मिनलवर झोपतात. मंदिराला दान करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१९ मध्ये सुद्धा त्यांनी भीक मागून जमा केलेली रक्कम मंदिराला दान केली होती. त्यांचा हा दानशूरपणा पाहून एका हॉटेलचालकाने पुढाकार घेत त्यांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली.
आणखी वाचा : बाबो! ही महिला भिकारी फाडफाड इंग्रजी बोलतेय ! कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलीय; पाहा VIRAL VIDEO
केम्पम्मा यांना कोणीही आश्रित नाही. त्यांच्या कुटूंबियाबद्दल किंवा त्यांच्या गावाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत माहिती देण्याची केम्पम्मा यांना स्वतःला इच्छा नसल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र, आजच्या काळात जिथे पैश्यांसाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, तिथे या महिला भिकारीने भीक मागून जमा केलेली रक्कम खुल्या हाताने मंदिराला दान केली, हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या दातृत्वाचा सोशल मीडियावर गौरवही केला जातोय. केम्पम्मा यांचा हा स्वभाव, दानशूरपणा कळल्यानंतर अनेकजण या आजीला सढळहस्ते भिक्षा देऊ लागलेत. परिसरात त्या चांगत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.