Mysuru Palace Elephants Clash Video : हत्ती हा खूप शांत आणि बुद्धिमान प्राणी मानला जातो; परंतु तो कधी रागावला, तर तो कधी काय करेल ते सांगता येत नाही. कारण- असा हत्ती अतिशय रौद्र रूप धारण करतो. २० सप्टेंबरच्या रात्री म्हैसूर पॅलेसमध्येही हत्तींचे असेच काहीसे रूप पाहायला मिळाले, जिथे दोन संतापलेले हत्ती अचानक एकमेकांशी भिडले. या घटनेने संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन हत्तींचा एकमेकांवरील हल्ल्याचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहे; जो पाहून अनेकांनी भीती व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये एक हत्ती दुसऱ्या हत्तीचा चक्क पाठलाग करताना दिसत आहे. यावेळी दोन्ही हत्ती रागावलेले दिसत आहेत. म्हैसूर पॅलेसच्या ईस्टर्न गेटवर घडलेली ही घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

धनंजय आणि कांचन एकमेकांना भिडतात तेव्हा…

जे दोन हत्ती आपापसांत एकमेकांना भिडले त्यांची नावे धनंजय आणि कंजन अशी आहेत. धनंजयचे वय ४३; तर कंजनचे वय २५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हैसूर पॅलेसमध्ये दसरा उत्सवाच्या प्रशिक्षणासाठी हे दोन्ही हत्ती आणले गेले होते. पण, शुक्रवारी रात्री जेवणाच्या वेळी दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी एक माहुत धनंजयवर स्वार होता; पण अचानक धनंजय कंजनबरोबर भिडू लागला. त्याला टाळण्यासाठी कंजन म्हैसूर पॅलेसमधून बाहेर पळत सुटला. पण, धनंजयही त्याच्या मागे धावू लागला. त्यामुळे राजवाड्याबाहेर एकच गोंधळ उडाला. हत्तींनी चक्क म्हैसूर पॅलेसचे बॅरिकेड्स तोडून, रस्त्याच्या दिशेन धाव घेतली.

मद्यधुंद व्यक्तीचे किळसवाणे कृत्य! रस्त्यावरून वाहणारी दारू चक्क प्राण्यासारखी चाटून प्यायला; पाहा VIDEO

यावेळी हत्तींना धावत येताना पाहून लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. पण, धनंजयवर स्वार असलेल्या माहुताने आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच दोन्ही हत्तींना नियंत्रणात आणले. त्यानंतर त्या दोन्ही हत्तींना परत पॅलेसमध्ये आणण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे म्हैसूर पॅलेस परिसरात काही वेळ का होईना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; पण परिस्थिती नियंत्रणात येताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

म्हैसूर पॅलेसमध्ये दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि पूर्ण १० दिवस येथे उत्सवी वातावरण असते. म्हैसूरचे राजघराणे आणि कर्नाटक सरकार यांच्या वतीने हा दसरा एकत्रित साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संपूर्ण म्हैसूर शहर नववधूप्रमाणे सजते. सर्वत्र रंगांच्या उधळणीचे सुंदर असे वातावरण तयार होते आणि म्हैसूर शहर एक लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते, असे सांगितले जाते. या उत्सवात हत्तींच्या स्वारीही सजून बाहेर पडतात. याच दसरा उत्सवासाठी कंजन आणि धनंजय या हत्तींना प्रशिक्षण देण्यासाठी येथे आणले गेले होते.