Anand Mahindra latest Tweet: नुकत्याच पार पडलेल्या फिफा विश्वचषकात २०२२ अर्जेंटिनाने फ्रान्सला धूळ चारत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर जल्लोष करत धुमाकूळ घातला. आता पुन्हा एकदा एका नव्या व्हिडीओनं इंटरनेटवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाच मुलांची आई असलेल्या एका भारतीय महिलेनं मेस्सीला आणि अर्जेटिना संघाला शुभेच्छा देण्यासाठी केरळहून महिंद्रा थार एसयुव्हीने थेट कतार गाठलं. फिफा विश्वचषक पाहण्यासाठी एकटीने तब्बल २९७३ किमीचा प्रवास केला. ३३ वर्षीय नाजी नौशी यांनी केरळ ते कतार या सोलो रोड ट्रीप केल्यानं महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. नौशी यांनी मोठं साहस दाखवून उत्कंठा वाढवणारा प्रवास केल्याने महिंद्रांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. महिंद्रा यांनी ट्विट करत नौशी यांचा व्हिडीओ शेअर करून सुंदर कॅप्शनंही लिहिलं आहे.
आनंद महिंद्रांनी नाजी नौशी यांचा व्हिडीओ केला शेअर
नाजी नौशी यांनी महिंद्रा थारमध्ये स्वयंपाक घराचा जबरदस्त सेटअपही केला होता. १५ ऑक्टोबरला केरळहून निघालेल्या नाजी कतारच्या प्रवासाचे सर्व अपडेट्स इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या. त्यांच्या या धाडसी वृत्तीचं आनंद महिंद्रांनी कौतुक केलं आहे. महिंद्रा ट्विट करत म्हणाले, मी व्हिडीओ शेअर करण्याआधी प्रतीक्षा केल्याचा मला आनंद झाला. कारण अर्जेंटिना आणि मेस्सीच्या विजयासोबतच या महिलेनं केलेल्या भव्य प्रवासाचाही विजय झाला आहे. नाजी यांनी साहस दाखवून उत्कंठा वाढवणारा प्रवास केल्यानं मी त्यांच्या कार्याला सलाम करतो. थारमध्ये त्यांनी दाखवलेला आत्मविश्वासाबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. लोकांचं शोर्य आणि जगाविषयी जिज्ञासा वाढवणे, अशी या कारची खासीयत आहे.”
इथे पाहा व्हिडीओ
आनंद महिंद्रा यांनी नाजी यांचा शेअर केलेला व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ही खूप महान गोष्ट आहे की, नाजी नौशी यांनी मोठं धाडस करून महिंद्रा थारने कतारपर्यंत केलेल्या प्रवासाची आनंद महिंद्र यांनी दखल घेतली. फिफा विश्वचषकात मेस्सी आणि अर्जेंटिनाला फ्रान्स विरुद्धच्या सामन्यात चिअर कप करण्यासाठी केलेला प्रवास जबरदस्त आहे.” नाजी नौशी यांच्या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हजारो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.