चांद्रयान २ मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी स्पष्ट केले. लँडरचे तुकडे झालेले नाहीत, तर ते सुस्थितीत आहे. ते थोडे कललेल्या अवस्थेत आहे, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे ‘इस्रो’चे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश आले तर नेमके काय घडले हे समजू शकेल. इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक)च्या टीमने या अवतरणात नेमके काय चुकले असावे याचा शोध सुरू केला आहे. देशभरामधून विक्रम लँडरचा चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटरशी संपर्क व्हावा यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. असं असतानाच आता नागपूर पोलिसांनाही अगदी आगळ्या वेगळ्याप्रकारे विक्रम लँडर आणि ऑर्बिटरचा एकमेकांशी संपर्क व्हावा अशी इच्छा ट्विटवरुन व्यक्त केली आहे.
नागपूर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन विक्रम लँडर आणि ऑर्बिटरसंबंधित एक मजेदार ट्विट करण्यात आले आहे. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. हे ट्विट नागपूर पोलिसांनी विक्रम लँडररा उद्देशून लिहिले आहे. ‘प्रिय विक्रम, कृपा करुन उत्तर दे. सिग्नल तोडल्याबद्दल आम्ही तुला दंड करणार नाही,’ असं नागपूर पोलिसांनी म्हटलं आहे. विक्रम लँडर आणि ऑर्बिटरचा एकमेकांशी संपर्क तुटल्याने म्हणजेच सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचे ‘इस्रो’चे प्रमुख के. सीवन यांनी सांगितले होते.
एकीकडे चंद्रावरील विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा इस्त्रोचा प्रयत्न सुरु असतानाच देशात नवीन वाहतूक नियम आणि त्यामुळे आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ दंडाची चर्चा असताना नागपूर पोलिसांनी या दोन्ही गोष्टींची मजेदार सांगड घालत प्रत्येक भारतीयांच्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. अनेकांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना नागपूर पोलिसांचे कौतुक केले आहे.
Dear Vikram,
Please respond.
We are not going to challan you for breaking the signals!#VikramLanderFound#ISROSpotsVikram @isro#NagpurPolice— Nagpur City Police (@NagpurPolice) September 9, 2019
दरम्यान, एकीकडे संपूर्ण देश लँडरशी संपर्क होण्यासाठी प्रार्थना करत असतानाच हा संपर्क होणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. चंद्रावर आधीच लँडरचे अवतरण झाले आहे. आता त्याला फिरवू शकत नाही. त्याचे अँटेना भूकेंद्राच्या दिशेने नाहीत किंवा ऑर्बिटरच्या दिशेलाही नाहीत, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होणे कठीण आहे. पण अँटेना वळवता आले तर संपर्क शक्य आहे. लँडरवर सौर बॅटरी आहेत, त्या फारसा वापरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे विजेचा प्रश्न नाही. तरीही हे सर्व अवघड आहे, असे सांगण्यात येत आहे.