संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा अखेर चंद्रावर शोध लागला असून आता विक्रमने प्रतिसाद द्यावा अशी देशवासियांची इच्छा आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी केलेल्या एका भावनिक टि्वटने इंटरनेटवर सगळयांचीच मने जिंकून घेतली आहेत. विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित होते. पण हार्ड लँडिंगमुळे विक्रम एकाबाजूला कललेल्या अवस्थेत आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे वैज्ञानिक विक्रम लँडर बरोबर पुन्हा संपर्क साधण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. चंद्रावरील अडथळयांमुळे लँडरपर्यंत सिग्नल पोहोचत नसावेत असे चांद्रयान-१ चे संचालक एम. अण्णादुराई यांनी रविवारी सांगितले.

‘प्रिय विक्रम, कृपाकरुन प्रतिसाद दे,’ सिग्नल मोडला म्हणून आम्ही तुला दंड आकारणार नाही असे भावनिक टि्वट नागपूर पोलिसांनी केले आहे. त्या टि्वटमध्ये हात जोडलेला एक इमोजी सुद्धा आहे. नागपूर पोलिसांच्या या टि्वटने इंटरनेटवर सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत.

सोशल मीडियावर नागपूर पोलिसांच्या या टि्वटचे भरपूर कौतुक होत आहे. चंद्रापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. अजूनही हा संपर्क प्रस्थापित झालेला नाही.

Story img Loader