Nagpur Viral Video : अपघाताची वाढती संख्या रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक नियम लावण्यात आलेले आहेत. त्यापैकी हेल्मेट सक्ती हा एक महत्त्वाचा नियम मानला जातो. दुचाकी चालवताना चालकाने हेल्मेट घालणे आवश्यक आहे, असा हेल्मेट सक्तीचा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ शूट करत एक व्यक्ती त्याला हेल्मेट घालण्यास सांगते. पण पोलीस मात्र थेट त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतो. ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पोलीस कर्मचारी दुचाकी चालवताना दिसत असेल. त्याने हेल्मेट घातलेले नाही. हे पाहून रस्त्याने जाणारी एक व्यक्ती पोलीसाला हेल्मेट घालण्यास सांगते. पण पोलीस थेट एका ठिकाणी गाडी थांबवून त्या व्यक्तीलाही गाडी थांबण्यास सांगतो. जेव्हा दोघेही गाडी थांबवतात तेव्हा पोलीस त्या व्यक्तीला सांगतो की माझ्या दातावर उपचार सुरू आहे. हेल्मेट घातल्याने त्रास होतो. पण मला शिवीगाळी का केली? ती व्यक्ती आपण शिवीगाळी दिली नसल्याचे म्हणतो पण पोलीस काहीही ऐकत नाही आणि त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावते.
त्यानंतरही ती व्यक्ती म्हणते, “मी शिवी दिली नाही. आरामात बोला. तुम्ही मला मारत आहात. माझं न्यूज चॅनल आहे सर. मी पूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे पण मी शिवी दिली नाही.” पण पोलीस मात्र त्या व्यक्तीवर शिवी दिल्याचा आरोप करतो. शेवटी ती व्यक्ती पोलीस स्टेशनला जात असल्याचे सांगते. विशेष म्हणजे त्यानंतर पोलीस हेल्मेट घालताना दिसतो. ती व्यक्ती यावरून पोलीसाला जाब विचारताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. काही लोकांना नेमकी चूक कोणाची, असा प्रश्न पडलेला आहे.
व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ नागपुरातील जरीपटका ते मानकापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका नागरिकाने रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचा नियम सर्वसामान्यांसाठीच आहे का? की हा नियम पोलिसांना लागू होत नाही? असे प्रश्न युजर्स विचारत आहे.