Snake in Train Viral Video : पावसाळ्यात साप दिसणे ही सामान्य गोष्ट आहे; परंतु हे साप कधी कधी अशा ठिकाणी दिसतात, ज्याची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. विचार करा, तुम्ही ट्रेनमध्ये आनंदाने प्रवास करताय आणि अचानक तुम्हाला सीटवरून सरपटत जाणारा साप दिसला तर? नुसत्या विचारानेच भीतीने अंगावर शहारे आले ना! अहो, पण प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील जबलरपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये नुकतेच असेच दृश्य पाहायला मिळाले. या ट्रेनमध्ये अचानक एक साप प्रवाशाच्या सीटच्या जवळ रेंगाळताना दिसला; ज्याला पाहून घाबरलेल्या प्रवाशांनी पळापळ सुरू केली. या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेनच्या डब्यात पाच फुटांचा साप (Snake In Train)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गरीब रथ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक मोठा कोब्रा साप शयनयान डब्यामध्ये साइट बर्थवर फणा काढून बसला होता. या सापाला अन् त्यातही तो विषारी साप असल्याने प्रवासी स्वाभाविकत: खूप घाबरले. अनेक प्रवासी आपली सीट सोडून इकडे-तिकडे धावू लागले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून, तो सोशल मीडियावर टाकला; जो सध्या व्हायरल होत आहे. यावेळी प्रवासी गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये साप कुठून आला, असा प्रश्न विचारताना ऐकायला येत आहे. ही घटना जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्सप्रेस (१२१८७) मध्ये उघडकीस आली आहे.

Read More Trending News : गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील; पाहा विसर्जनानंतरचे मन हेलावून टाकणारे दृश्य

या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी ओरडत आणि किंचाळत असल्याचे ऐकू येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना साप दिसला तेव्हा ट्रेन सिग्नलमुळे कसारा रेल्वेस्थानकादरम्यान थांबली होती. कोच क्रमांक जी १७ च्या सीटखाली हा पाच फुटांचा साप लपला होता; जो अचानक साइट बर्थवर फणा काढून बसला होता. यावेळी प्रवाशांनी ब्लँकेटद्वारे सापाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, साप वरील एसी पॅनलमध्ये घुसल्याने काहीच करता येत नव्हते. त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दुसऱ्या बोगीत हलविले आणि साप असलेली बोगी लॉक केली. दरम्यान, या सापामुळे कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

पाहा ट्रेनमधील थरकाप उडवणारे दृश्य (Snake In Garib Rath Express Train)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर युजर्स विविध कमेंट्स करीत मजा घेताना दिसले. एका युजरने लिहिले की, “सापाने तात्काळ तिकीट घेतले होते वाटतं”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “त्याचे तिकीट कुठे आहे?” तिसऱ्या युजरने लिहिले की, “आता हे षडयंत्र कोणाचे आहे?”