जपान हा जगातील सर्वात कष्टकरी देशांपैकी एक म्हणुन ओळखला जातो. सुमारे ६८०० बेटांपासून तयार झालेल्या या देशाचे नाव जगातील कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. याच जपानमध्ये ‘सैदाजी एओ’ नावाचा एक उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात एक स्पर्धा आयोजीत केली जाते. ज्यात १० हजारांपेक्षा अधिक उत्साही पुरुष अर्धनग्न वेषात भाग घेतात व केवळ दोन काठ्या मिळवण्यासाठी एकमेकांबरोबर स्पर्धा करतात. जो पुरुष दोन काठ्या मिळवण्यात यशस्वी होतो त्याला वर्षातील सर्वात भाग्यवान पुरुष असे समजले जाते.

५०० वर्षांपूर्वी जपानमधील मुरोमाची कालखंडात हा उत्सव सुरू झाला होता. तेव्हा पासून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. यंदाचे या उत्सवाचे ५१० वे वर्ष आहे. ओकायामा शहरातील किनरयोजान सैदाजी या बौद्ध मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवात वापरल्या जाणाऱ्या या काठ्यांना शिंगी असे म्हटले जाते. उत्सवात सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेत भाग घेणारे सर्व पुरुष तिथल्या योशी नदीत स्नान करतात. त्यानंतर पारंपरिक पंचा परिधान करून ते स्पर्धेसाठी सज्ज होतात. त्यानंतर सर्व पुरुषांना एकत्र करुन गर्दीत काठ्या फेकल्या जातात. त्या काठ्यांना मिळवण्यासाठी हजारो स्पर्धक एकमेकांवर तुटुन पडतात.

हा उत्सव पाहणाऱ्यांच्या घरात सुबत्ता येते असा जापानी नागरीकांचा विश्वास आहे. त्यामुळे या उत्सवासाठी मंदिरात केलेला दिपोत्सव व काठी मिळवण्यासाठी केली जाणारी झुंबड पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमतात.

Story img Loader