भारताची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भारताने अनेक संकटांवर सक्षमरित्या मात केली आहे. करोना काळात तर भारताने इतर देशांना मदतीचा हात दिला. करोनावरील लस निर्मितीत भारत आघाडीवर होता. त्यामुळे गेल्या काही वर्षात जगभरात भारताचा डंका वाजत आहे. असं असताना लंडनमधील एका स्थानकाचं नाव चर्चेत आलं आहे. या स्टेशनचं नाव पाहता आपण भारतात आहोत की लंडनमध्ये असा प्रश्न पडतो.
लंडनच्या ट्यूब रेल प्रकल्पाच्या व्हाईटचॅपल स्टेशनची ओळख पटवण्यासाठी आता साईनबोर्डवर स्टेशनचे नाव इंग्रजी भाषेसह बंगाली भाषेत लिहिण्यात आले आहे. या स्टेशनची चर्चा आता भारतापासून बांगलादेशपर्यंत रंगू लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यासंदर्भात ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, लंडनच्या प्रशासकांनी घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान आहे. यावरून जगभरात सुमारे एक हजार वर्षे जुन्या भाषेचा दर्जा आणि महत्त्व जगभर वाढल्याचे दिसून येते.
बांगलादेशचे कॅबिनेट मंत्री जुनैद अहमद यांनीही त्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विट करून आपला आनंदही व्यक्त केला आहे. त्याच वेळी, शहराचे महापौर जॉन बिग्स यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की व्हाईटचॅपल स्टेशनवर आता इंग्रजी आणि बंगाली दोन्ही भाषांमध्ये द्विभाषिक चिन्हे पाहून खूप आनंद झाला.