पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळीच गुजरातमध्ये त्यांची आई हिराबेन मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींनी आज वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्तच ही विशेष भेट त्यांनी घेतली. या भेटीचे मोदींनी काही फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केल्यानंतर आता याच फोटोशूटवरुन महाराष्ट्र काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींवर टीका केली आहे. खोचक शब्दांमध्ये पटोले यांनी अप्रत्यक्षपणे मोदींच्या या फोटोंवर कमेंट केलीय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: आजचा दिवस पंतप्रधान मोदींसाठी फारच खास… आईच्या पायाशी जाऊन बसले अन्…
हिराबा या नावानेही अनेकजण मोदींच्या मातोश्री हिराबेन यांना ओळखतात. पंतप्रधान मोदींनी आज आईच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. मोदींनी या फोटोंना एक छान कॅप्शनही दिली आहे. “आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे. या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून ते आईशी हसून चर्चा करत आहेत. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी शेअर केलेले हे फोटो अल्पावधीत व्हायरल झाले असून पोस्ट केल्यानंतर आत्तापर्यंत २६ हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.
एकीकडे मोदींनी शेअर केलेल्या या फोटोंची चर्चा असतानाच दुसरीकडे नाना पटोलेंनी सोशल नेटवर्किंगवरुन मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मोदींचा थेट उल्लेख केला नसला तरी सकाळपासून मोदींनी आईसोबतचे फोटो पोस्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर पटोलेंनी, “आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का?,” असा खोचक प्रश्न पोस्टमधून विचारलाय. पुढे पटोलेंनी, “असो! आईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!,” असंही म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकालानंतर याच वर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास हिराबा यांची त्यांच्या अहमदाबाद इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांनी ही भेट घेतली होती. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंतप्रधान त्यांच्या आईला भेटले नव्हते. मार्च महिन्यातील ही भेट दोन वर्षांमधील पहिलीच भेट ठरली.
नक्की वाचा>> PM Modi’s Mother 100th Birthday: हिराबेन मोदी मार्ग! पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या दिवशी अनोखा सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या गांधीनगरजवळच्या रायसन भागातील निवासस्थाला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबा या सध्या इथंच राहत आहेत. रात्री नऊच्या सुमारास पंतप्रधान मोदी आपली सर्व कामं संपवून घरी गेले. त्यावेळी मोदी यांनी आपल्या आईचे आशिर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं होतं.