अमेरिकेमधील ऑरेगनमधील पोर्टलॅण्ड येथील प्रेमकथा लिहिणाऱ्या एका महिला कांदबरीकाराला पोलिसांनी अटक केली आहे. ‘हाऊ टू मर्डर युआर हसबंड’ नावाचा निबंध प्रकाशित करणाऱ्या या लेखिकेने स्वत:च्याच पतीची हत्या केल्याचा गुन्हा पोलिसांनी न्यायालयासमोर पुराव्यांसकट सिद्ध केलाय. सध्या या प्रकरणाची अमेरिकेमध्ये फारच चर्चा आहे.
प्रकरण काय…
अमेरिकेतील या महिला लेखिकेचं नाव नॅसी कॅम्पटन ब्रोफी असं आहे. आपल्याच पतीची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलंय. नॅसीचा पती म्हणजेच ६३ वर्षीय डिनॅअल ब्रोफी हे २ जून २०१८ रोजी मृतावस्थेत आढळून आले होते. पोर्टलँडमधील साऊथवेस्ट कालनलरी इन्स्टीट्यूट ऑफ पोर्टलँडमध्ये डॅनिअल काम करायचे. पाककलेसंदर्भातील प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेमध्येच डॅनिअलची हत्या करण्यात आलेली.
हत्या झाली तेव्हा पत्नी संस्थेच्या परिसरात…
तब्बल पाच आठवडे या प्रकरणाची सुनावणी म्युल्टनोम्ह येथील न्यायालयामध्ये सुरु होती. या प्रकरणामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या महिलेला दोषी ठरवलं आहे. संस्थेच्या आवारामध्येच डॅनिअल यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या आवारात मृतावस्थेत सापडले होते. न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार आणि पुराव्यांनुसार जेव्हा डॅनिअल यांची हत्या झाली त्यावेळी त्यांची पत्नी ही संस्थेच्या आवारामध्येच होती. मात्र तपासादरम्यान नॅसीने पोलिसांना खोटी माहिती दिली.
या गोष्टीमुळे आला संक्षय…
आपण पूर्ववेळ घरीच असल्याचा दावा करत डिनॅअलच्या हत्येचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न त्यांची पत्नी नॅसी हिने केला. मात्र पोलिसांनी संक्षयित म्हणून तिची चौकशी केली. पतीच्या मृत्यूच्या काही महिनेआधीच नॅसीने बंदुकीचे सुट्टे भाग विकत घेतले होते. यापैकी काही भाग हे गोळी लागली तरी पटकन कळून न येणाऱ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानावर आधारित बंदुकांमध्ये वापरले जाणारे होते. याच गोष्टींमुळे पोलिसांना संक्षय आला आणि त्यांनी नॅसीनेच स्वत:च्या पतीची हत्या कशाप्रकारे केलीय हे सिद्ध करुन दाखवलं.
कादंबरीसाठी बंदुकीचे सुटे भाग विकत घेतल्याचा दावा
एकीकडे पोलिसांनी पुरावे सादर केले असतानाच दुसरीकडे नॅसी यांच्या वकीलाने आरोपीने बंदुकांचे सुट्टे भाग हे कादंबरीच्या लेखनाच्या निमित्ताने घेतल्याचा दावा केला. नॅसी लिहीत असणाऱ्या कादंबरीतील कथेमधील महिला ही बंदुकीचे सुटे भाग एकत्र करुन त्यापासून बंदूक बनवते आणि छळ करणाऱ्या पतीची हत्या करते असे कथानक असल्याने, त्यासंदर्भातील अभ्यासाठी हे भाग विकत घेण्यात आल्याचा दावा नॅसीच्या वकिलांकडून करण्यात आला. नॅसी आणि डॅनिअल यांचे मागील २५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते असाही दावा बचावपक्षाकडून न्यायालयामध्ये करण्यात आला.
११ न्यायाधीशांची आठ तास चर्चा…
खंडपीठातील असणारे पाच पुरुष न्यायाधीश आणि सात महिला न्यायाधीशांनी जवळजवळ आठ तास चर्चा केल्यानंतर निर्णय दिल्याचं वृत्त ऑरेगन लाइव्हने दिलं आहे. या प्रकरणामध्ये नॅसीला दोषी ठरवण्यात आल्यानंतर आता त्या वरिष्ठ न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
मुख्य पुरावा ठरला सिग्नलवरील सीसीटीव्ही
नॅसी यांना मागील वर्षी पाच सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून तेव्हापासून त्या तुरुंगामध्येच आहेत. डॅनिअल यांची हत्या झाली त्यावेळेस त्यांच्या संस्थेच्या बाहेरील सिग्नलवर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये नॅसी दिसल्याचा दावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधील पुराव्यांत करण्यात आलाय.
त्या निबंधात नेमकं आहे काय?
‘हाऊ टू किल युआर हसबंड’ या मथळ्याखाली एका ब्लॉग पोस्टमधून नॅसी यांनी आपला निबंध प्रकाशित केला होता. यामध्ये त्यांनी आपल्या जोडीदाराला संपवण्यासाठी कोणते मार्ग अवलंबता येतील याबद्दल चर्चा केलीय. हा निबंध आजही ऑनलाइन उपलब्ध आहे. नॅसी दोषी ठरल्यानंतर आता निबंध पुन्हा चर्चेत आलाय. या प्रकरणामध्ये नॅसी यांना १३ जून रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.