Narayana Murthy : इन्फोसिसचे सर्वेसर्वा आणि देशातल्या आयटी क्षेत्रातले दिग्गज म्हणून ओळखले जाणारे नारायण मूर्ती ( Narayana Murthy ) हे कायमच चर्चेत असतात. कामाचे तास किती असावेत याबाबत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं ज्यामुळे ते चर्चेत आले होते. आता नारायण मूर्ती ( Narayana Murthy ) चर्चेत आले आहेत कारण त्यांनी बंगळुरु या ठिकाणी एक आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराचं विजय मल्ल्याशीही कनेक्शन आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हीही चकित व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी नारायण मूर्ती काय म्हणाले होते?

“गेल्या दोन-तीन दशकांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, भारतात काम करणाऱ्यांची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. ती वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम केलं पाहिजे.” असं मत नारायण मूर्ती ( Narayana Murthy ) यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे ते चर्चेतही आले होते तसंच त्यांच्यावर टीकाही झाली होती. दरम्यान त्यांनी घेतलेल्या ५० कोटींच्या आलिशान घरामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

हे पण वाचा- Ratan Tata Death : “…अन् मी रतन टाटांकडून नम्रतेचा धडा घेतला”, नारायण मूर्तींनी सांगितली जुनी आठवण!

नारायण मूर्तींनी बंगळुरुत विकत घेतलं ५० कोटींचं आलिशान घर

नारायण मूर्ती यांनी बंगळुरुमधल्या किंगफिशर टॉवरमधल्या १६ व्या मजल्यावर ८ हजार ४०० चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. या घराची किंमत ५० कोटी रुपये आहे. प्रति चौरस फूट ५९ हजार ५०० रुपये या दराने नारायण मूर्ती यांनी हे आलिशान घर विकत घेतलं आहे. या घरात चार बेडरुम आहेत. तसंच या घरासाठी पाच कार पार्किंगची सोय आहे. चार वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती यांनीही याच टॉवरच्या २३ व्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला होता. त्या फ्लॅटची किंमत २९ कोटी रुपये होती असं वृत्त तेव्हा आलं होतं. आता नारायण मूर्ती ( Narayana Murthy ) यांनी ५० कोटी रुपये खर्च करुन या इमारतीत आणखी एक घर घेतलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

विजय मल्ल्याशी या घराचं कनेक्शन काय?

बंगळुरुतील किंगफिशर टॉवर्स हे ३४ मजली निवासी संकुल आहे. ४.५ एकर जागेवर हे संकुल वसलेलं आहे. यामध्ये तीन इमारती असून ८१ अपार्टमेंट्स आहेत. या टॉवरमधले सगळे फ्लॅट ४ बीएचके आहेत. तर त्यांचं क्षेत्रफळ हे ८ हजार चौरस फुटांपासून सुरु होतं. देशातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याचा या टॉवरशी थेट संबंध आहे. किंगफिशर टॉवर्सच्या जागेवर विजय मल्ल्याच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर होतं. त्याच जागेवर हे आलिशान टॉवर्स उभारण्यात आले आहेत. २०१० मध्ये प्रेस्टिज ग्रुप आणि विजय मल्ल्या यांच्या कंपनीच्या संयुक्त सहकार्यातून हा प्रकल्प विकसित करण्यात आला होता. सुरुवातीला अपार्टमेंट २२ हजार प्रति चौरस फूट दराने विकले जात होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayana murthy buys rs 50 cr luxury apartment in bengaluru kingfisher towers what is the connection with vijay mallya scj