Narayana Murthy Criticizes Coaching Classes : देशातील सर्वांत मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक व आघाडीचे उद्योपती नारायण मूर्ती अनेक गोष्टींवर परखड, स्पष्ट मत मांडतात. अशात त्यांनी मुलांचे शैक्षणिक जीवन आणि त्यात पालकांची असणारी महत्त्वाची भूमिका याविषयी आपले स्पष्ट मत मांडलेय. “मुलांच्या शिक्षणासाठी घरात शिस्तीचे वातावरण निर्माण करणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी स्वतः बसून चित्रपट पाहायचा आणि मुलांना अभ्यास करण्यास सांगायचे, हे चुकीचे आहे”, असे स्पष्ट मत त्यांनी मांडलेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पालकांनी मुलांना केवळ सूचना द्यायच्या नाहीत, तर त्यांचे ते आदर्श बनले पाहिजेत”, असा सल्ला देत त्यांनी त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी मुलांचे कशा प्रकारे संगोपन केले त्याबद्दलही सांगितले. नारायण मूर्ती यांच्या हस्ते सोमवारी बेंगळुरूमधील इन्फोसिस सायन्स फाउंडेशनमध्ये पॉल जी हेविट यांच्या ‘कॉन्सेप्च्युअल फिजिक्स’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोचिंग क्लासेसच्या शिकवणीवरही भाष्य केले.

सुधी मूर्तींनी मुलांचा कशाप्रकारे घेतला अभ्यास

सोशल मीडियाच्या जमान्यात मुलांनी अभ्यासावर कसे लक्ष केंद्रित करावे, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या कुटुंबाचे उदाहरण देत सांगितले की, “माझी मुले लहान असताना माझी पत्नी सुधा मूर्ती यांनी काही नियम केले होते. त्यांची मुले शाळेत असताना त्यांची पत्नी सुधा मूर्ती या त्यांची मुले अक्षता व रोहन यांच्यासोबत दिवसातून तीन तास अभ्यास करीत असत. त्यामुळे मुलांसाठी अभ्यासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.”

“मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत टीव्ही पाहणे दिले सोडून”

नारायण मूर्ती यांनी पुढे सांगितले की, “त्यांच्या ठिकाणी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत मुले अभ्यास करीत असत. यावेळी टीव्ही पाहण्यास परवानगी नव्हती. त्यानंतर रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा कुटुंब एकत्र अभ्यास करायचे. माझ्या पत्नीचा युक्तिवाद होता की, मी टीव्ही पाहतो, तर मी माझ्या मुलांना अभ्यास करण्यास सांगू शकत नाही. त्यामुळे मी मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत टीव्ही पाहणे सोडून दिले. पालक चित्रपट बघतात आणि मुलांना अभ्यास करायला सांगतात, हे योग्य नाही.”

“कोचिंग क्लासेसवर विश्वास नाही (Narayana Murthy Weighs On Coaching Classes Culture)

आयआयटी आणि एनआयटीसारख्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोचिंग क्लासेस महत्त्वाचे आहेत का, या प्रश्नावर उत्तर देताना नारायण मूर्ती म्हणाले की, मुलांना कोचिंग क्लासला जाण्याची गरज नाही. माझा कोचिंग क्लासेसवर विश्वास नाही. अशा मुलांनाच कोचिंगची गरज असते, जी मुले शाळेमध्ये वर्गात असताना शिक्षक काय बोलतात, काय शिकवतात याकडे पूर्ण लक्ष देत नाहीत. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंगची मदत घेणे हा चुकीचा मार्ग आहे. मुलांनी घोकंपट्टी करून लक्षात ठेवण्याऐवजी समजून घेण्यावर आणि विचार करण्यावर भर दिला पाहिजे.

Read More Trending News : तरुणाच्या रिलमुळे वाचला वृद्धाचा जीव, चालत्या ट्रेनमधून खाली कोसळला अन् तितक्यात…; पाहा धक्कादायक VIDEO

“देशाच्या भल्यासाठी तुम्ही माझ्यापेक्षा चांगले व्हा”

यावेळी एका मुलाने त्यांना विचारले की, आम्हाला तुमच्यासारखे होण्यासाठी काय करावे लागेल, यावर ते म्हणाले की, “तुम्ही माझ्यासारखे व्हावे, असे मला वाटत नाही. देशाच्या भल्यासाठी तुम्ही माझ्यापेक्षा चांगले व्हावे, अशी माझी इच्छा आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayana murthy criticizes coaching classes i don t believe in coaching classes wrong way to help children sjr