आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. त्या घोषणेला आता पन्नास दिवसही उलटून गेले. ३१ डिसेंबर रोजी आपण भारताला संबोधित करणार आहोत अशी पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर ट्विटर आणि सोशल मिडियावर तर्क वितर्कांना उधाण आले आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात नेमकं काय बोलतील याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका पबने एक छोटासा खेळ खेळण्याची शक्कल लढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जितक्या वेळी ‘मित्रों’ असे म्हणतील तितक्यावेळी तुम्हाला केवळ ३१ रुपयांना ड्रिंक किंवा बीअर मिळणार आहे. दिल्लीतील सोशल ऑफलाइन या क्लबने ही आइडिया तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ तारखेला ७.३० वाजता सायंकाळी भाषण देणार आहेत. आमच्या पबमध्ये येऊन आपल्या पंतप्रधानांचे भाषण ऐका आणि जितक्या वेळी ते भाईओ और बहनों म्हणतील किंवा मित्रों म्हणतील तेव्हा तुम्हाला ३१ रुपयांना ड्रिंक मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मिडियावर जितकी नरेंद्र मोदींच्या भाषणाची चर्चा होत आहे तितकीच चर्चा या पबच्या ऑफरची आहे. एका मुलाने या पबपासून ‘आइडिया’ घेऊन एक अख्खा ड्रिंकिंग गेमच तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आठ नोव्हेंबर रोजी मेरे प्यारे देशवासियो असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या भाषणात मित्रों आणि भाईओ और बहनों हे शब्द सातत्याने येत असतात तेव्हा त्यांच्या याच शब्दांवर स्वस्तात ड्रिंक्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अर्थात या ऑफरला काही नियम आणि अटी देखील आहेत. या ऑफरमध्ये एका व्यक्तीला केवळ तीनदाच ड्रिंक घेता येणार आहे. संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेपुरतीच ही ऑफर मर्यादित आहे. या पेजवर आतापर्यंत शेकडो कमेंट्स आणि लाइक आले आहेत. तर सध्या इंटरनेटवर ही पोस्ट गाजत आहे.

Story img Loader