राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नरहरी झिरवळ हे सपत्नीक जपान दौऱ्यावर गेले होते. अंगात सदरा, धोतर. डोक्यावर गांधी टोपी आणि पायात चपला अशा पेहरावात नरहरी झिरवळ जपानला गेले. त्यांची पत्नीही नऊवारी लुगडं, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत आणि पायात वाहाना घालून जपानला गेल्या. दरम्यान जपान दौऱ्याहून परतलेले झिरवाळ यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जपान दौऱ्यातील सांगितलेला एक अनुभव चांगलाच गाजला आहे. यातील नरहरी झिरवळ यांचा पत्नीसोबतचा स्वेटर खरेदीचा फसलेला किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दौऱ्यादरम्यान पोशाख बदलणार नाही

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते २३ एप्रिल या काळात जपानमध्ये विधानमंडळ सदस्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी जपानला गेले होते. त्यांचा विमानतळावरचा मराठमोळ्या पोशाखातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. जपान दौऱ्यावरुन परतल्यानंतर झिरवळ यांनी दौऱ्याच्या काही आठवणी सांगितल्या. झिरवळ म्हणाले, “जपान दौरा हा माझ्याच नाही, तर माझ्या पूर्वजांच्याही जीवनातला मोठा अनुभव. मी या दौऱ्यादरम्यान माझा पोशाख बदलणार नाही, हे आधीच ठरवलं होतं.

२८ हजारांचा स्वेटर, पत्नी म्हणाली, नाशिकला घेऊ!

दरम्यान जपान दौऱ्यावर असताना नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नीचा फसलेला स्वेटर खरेदीचा अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले, मी माझ्या पत्नीसोबत स्वेटर खरेदी करायला एका दुकानात गेलो. तिथे आम्हाला एका स्वेटरची किंमत २८ हजार रुपये सांगितली. हे ऐकून माझी बायको म्हणाली, एवढ्या पैशात तर घरातील सर्वांना स्वेटर घेऊनही पैसे उरतील. आपल्या नाशिकला तर १२०० रुपयात स्वेटर मिळतो, असे ती म्हणाली आणि आम्ही दुकानातून काहीच न घेता बाहेर पडलो. नाशिकच्या थंडीत पत्नी काम करते. त्यामुळे तिला थंडीचं एवढं काही नव्हतं पण आग्रहामुळे दुकानात स्वेटर घ्यायला गेलो. यानंतर मी आता किंमती विचारायच्या नाही, थेट खरेदी करायची असे ठरवून पत्नीला वस्तू खरेदीसाठी आग्रह धरला. मात्र ती काही केल्या तयार होईना. शेवटी नातवंडासाठी काही खेळणी घेतली आणि भारतात परतल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

हेही वाचा – VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने पोलिसांना केली मारहाण, आधी धक्काबुक्की आणि मग अधिकाऱ्याच्या…

नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पक्ष कोणताही असो, पण या साधेपणाचं मनमोकळं कौतुक केलंच पाहिजे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narhari zirwal japan visit shares funny incident of tour srk
Show comments