आता पृथ्वीच्या बाहेरुन म्हणजेच थेट अंतराळातून देखील मानवाने गुन्हे करण्यास सुरूवात केली आहे. याबाबत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पृथ्वीच्या बाहेर अंतराळात झालेला पहिला गुन्हा नोंदवल्याचा दावा केला आहे. ‘नासा’ या प्रकरणाची चौकशी करत आहे.
महिला अंतराळवीर अॅनी मॅकक्लेन हिच्यावर यासंबंधी आरोप करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून विभक्त समलिंगी जोडीदाराचे बँक अकाउंट अवैधपणे हाताळून तिच्या वित्तीय नोंदींची तपासल्याचा आरोप तिच्यावर आहे. तिच्याविरोधात तिची विभक्त झालेली जोडीदार समर वॉर्डनने तक्रार केली आहे. मॅकक्लेन सहा महिन्यांच्या अवकाश मोहिमेवर होती आणि जूनमध्येच ती पृथ्वीवर परतली आहे. या मोहिमेदरम्यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून नासाचं एक कम्प्युटर वापरुन तिने समर वॉर्डनचे बँक अकाउंट हॅक केल्याचा आरोप आहे.
याबाबत शंका आल्यानंतर वॉर्डनने काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या फेडरल वाणिज्य आयोग आणि ‘नासा’ या दोन्ही ठिकाणी तक्रार दाखल केली होती. परवानगीशिवाय बँक खात्याची माहिती तपासण्यात आल्याचं तिने तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर, जूनमध्ये अंतराळातून पृथ्वीवर परत आल्यानंतर मॅकक्लेनने देखील आपला गुन्हा कबुल केला आहे. पण, दोघांमधील वित्तीय माहिती तपासण्यासाठीच तिने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून बँक खात्याची माहिती तपासली आणि यात काहीच चुकीचं नसल्याचं मॅकक्लेनच्या वकिलाने म्हटलं आहे. दोघींचं 2014 मध्ये लग्न झालं होतं, त्यानंतर 2018 मध्ये ते विभक्त झाले. पण त्या दोघी मिळून एक मूल वाढवत आहेत आणि त्याच्या पालनपोषणासाठी पुरेसा पैसा आहे की नाही, हेच तपासण्याचा मॅकक्लेनचा प्रयत्न होता, असे वकिलाने म्हटलंय. मॅकक्लेननेही ट्विटरवरून हे आरोप फेटाळले आहेत. ‘या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. महासंचालकांकडून होणाऱ्या चौकशीवर विश्वास आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया देईल’, असं तिने म्हटलंय.
There’s unequivocally no truth to these claims. We’ve been going through a painful, personal separation that’s now unfortunately in the media. I appreciate the outpouring of support and will reserve comment until after the investigation. I have total confidence in the IG process.
— Anne McClain (@AstroAnnimal) August 24, 2019
‘नासा’मध्ये कार्यरत होण्यापूर्वी मॅकक्लेन अमेरिकेच्या लष्करामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होती. इराकमधील मोहिमांमध्ये तिने 800 तास उड्डाण केले आहे. लष्करातील नोकरी सोडत 2013मध्ये तिने ‘नासा’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. लष्करातील गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाचा उपयोग करतच तिने बँक अकाउंटची माहिती मिळवली असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाचा ‘नासा’कडून तपास सुरू असून जर गुन्हा सिद्ध झाला तर हा अवकाशातून मानवाने केलेला पहिलाच गुन्हा ठरणार आहे.