पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या अस्तित्वामागे सूर्याचा मोठा वाटा आहे. सूर्य नसता तर ही सृष्टीही नसती. आपण दररोज सूर्याला त्याच्या वेगवेगळ्या रूपात पाहत असतो आणि त्याचे बदलणारे तापमान अनुभवत असतो. मात्र तुम्ही कधी सूर्याला हसताना पाहिलं आहे का? आपण वेगवेगळ्या कार्टून कार्यक्रमामध्ये सूर्याला हसताना पाहिलं असेल किंवा लहान असताना चित्रकलेच्या तासाला सूर्याचे हसतानाचे चित्रही काढले असेल. मात्र नुकताच नासाने खऱ्या सूर्याचा हसतानाचा एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
नासाच्या उपग्रहाने पहिल्यांदाच सूर्याचे हसतमुख छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केले आहे. गुरुवारी हा फोटो घेण्यात आला. नासाने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘आज, नासाच्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेने सूर्याचे हास्य कॅमेऱ्यात कैद केले. अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात दिसणारे, सूर्यावरील हे गडद ठिपके कोरोनल होल म्हणून ओळखले जातात. अवकाशातून वाहणाऱ्या तीव्र सौर वाऱ्यांचे ते क्षेत्र आहे.’
हा फोटो पाहिल्यावर असे वाटते की सूर्य आपल्याकडे पाहून हसत आहे. नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीमधून काढलेले हे छायाचित्र पाहता असे दिसते की सूर्याचे दोन गडद डोळे, एक गोल नाक आणि आनंदी हास्य आहे. नासाने २०१० साली सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी (SDO) लाँच केली होती. तेव्हापासून ते अंतराळातून सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असून याचा उपयोग अवकाशातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आणि ताऱ्यांच्या चमक आणि स्फोटाचा मागोवा घेण्यासाठी केला जातो. मात्र, काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सूर्याचे हे हास्य पाहून आनंदून न जाता त्याच्या रौद्र स्वरूपाबाबत वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे.
फायर हेअरकट करणं तरुणाच्या जीवावरच बेतलं; Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप
दरम्यान, नासाने शेअर केलेला सूर्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना सूर्याचा हा हसरा चेहरा कार्टून आणि सिनेमातील वेगवेगळ्या काल्पनिक पात्रांसारखा भासत आहे.