Natasa Stankovic Hardik Pandya Divorced: हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक या दाम्पत्याचा घटस्फोट हा दोन महिन्यांपूर्वीपर्यंत प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. टी २० वर्ल्डकपदरम्यानही हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. सुरुवातीला या दोघांकडून घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, अखेर जुलै महिन्यात दोघांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. आता दोघांच्या घटस्फोटाला एक महिना उलटल्यानंतर नताशा स्टॅनकोविकनं इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट नताशानं हार्दिकबाबतच लिहिली असल्याचा दावा आता केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बरीच चर्चा, शंका-कुशंका, तर्क-वितर्कांना खतपाणी मिळाल्यानंतर अखेर हार्दिक पंड्या व नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला. दोघांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली होती. तसेच, या काळात आपल्या खासगी आयुष्याचा लोकांनी आदर राखावा व आपल्या पाठिशी राहावं अशी विनंतीही त्यांनी चाहत्यांना व आप्तस्वकीयांना केली होती. त्यानंतर जवळपास महिनाभर या दोघांकडून एकमेकांबाबत किंवा त्यांच्यातील नात्याबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नव्हतं.

दरम्यान, हार्दिक पंड्या एका ब्रिटिश गायिकेला डेट करत असल्याच्या चर्चांना एकीकडे उधाण आलेलं असताना दुसरीकडे नताशा स्टॅनकोविकनं त्याचवेळी केलेली ही पोस्ट हार्दिकबाबतच असल्याचं बोललं जात आहे. या पोस्टमध्ये नताशानं प्रेमाबाबत, नात्याबाबत, नात्यांमध्ये असणाऱ्या अपेक्षांबाबत तिची मतं मांडली आहेत.

काय आहे नताशा स्टॅनकोविकच्या पोस्टमध्ये?

इन्स्टाग्राम स्टोरीवर नताशानं ही पोस्ट शेअर केली होती. “प्रेम म्हणजे धीर, प्रेम म्हणजे करुणा. प्रेमात आसूया किंवा मत्सर नसतो. प्रेमात बडेजाव नसतो. प्रेमात गर्व नसतो. प्रेम इतरांचा अपमान करत नाही. प्रेमात आत्मप्रौढी किंवा स्वकेंद्री वृत्ती नसते. प्रेमात चुकांची नोंद करून ठेवली जात नाही. प्रेमात दुसऱ्याच्या वाईटामध्ये आनंद शोधला जात नाही. प्रेमात खरेपणाचा खरा आनंद असतो. प्रेम कायम संरक्षण करतं, कायम विश्वास दर्शवतं, कायम आशा दाखवतं, प्रेमात चिकाटी असते. प्रेम कधीच हरत नाही”, असं नताशानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जास्मिन वालिया व हार्दिक पंड्या यांनी शेअर केलेले फोटो (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

नताशाच्या पोस्टमध्ये घटस्फोटाच्या कारणांचा उल्लेख?

दरम्यान, नताशानं हार्दिक पंड्याशी घटस्फोट का घेतला? याची कारणंच तिनं तिच्या पोस्टमध्ये सूचित केली आहेत, असं आता बोललं जात आहे. हार्दिक पंड्याच्या दिखाऊ आणि स्वकेंद्रीत वृत्तीशी नताशा जुळवून घेऊ शकली नाही असं या दाम्पत्याच्या काही जवळच्या लोकांनी टाईम्स नाऊला सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद केलं आहे.

Hardik Pandya : हार्दिक पंड्या नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ गायिकेला करतोय डेट? जाणून घ्या कोण आहे ती?

हार्दिकच्या नव्या अफेअरच्या चर्चा!

दरम्यान, नताशाशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पंड्या ब्रिटिश गायिका जॅस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. हार्दिक पंड्या व जॅस्मिन वालिया या दोघांच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सवरून काही युजर्सनं ते दोघे ग्रीसमध्ये एकत्रच सुट्टी घालवत असल्याचे तर्क बांधायला सुरुवात केली आहे. मात्र, या दोघांकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natasa stankovic criptic insta post after divorce with hardik pandya on love pmw