PM Narendra Modis Turban : भारत आज आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने देशभरातून आणि जगभरातून भारतावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वांच्या नजरा पंतप्रधान मोदींच्या खास फेट्यावर खिळल्या आहेत. कारण- दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या प्रकारचा फेटा, पगडी किंवा टोपी घालताना दिसतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा फेटा आकर्षणाचा भाग बनत आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी खास फेटा परिधान केला आहे. या वर्षीही त्यांनी बांधणी प्रिंट फेट्याची निवड केली आहे.

पंतप्रधान मोदींनी यंदा पिवळा, लाल व गुलाबी रंगाचा बांधणी प्रिंटचा फेटा परिधान केला आहे; ज्याच्या मागीस बाजूस निळा रंगही आहे. ही बांधणी प्रिंट राजस्थानमध्ये खूप लोकप्रिय आहे. या खास प्रिंटेड फेट्यामध्ये पंतप्रधान मोदी छान दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी फेट्यासह पांढरा कुर्ता चुडीदार पायजमा घातला आहे. त्याच्यावर त्यांनी तपकिरी रंगाचे जॅकेटही घातले आहे. पंतप्रधान मोदींचा हा लूक जनतेला खूप आवडला आहे. विशेष प्रसंगी फेटा घालणे हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. पंतप्रधान मोदी दरवर्षी ही परंपरा चांगल्या प्रकारे पाळतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०१५ ते २०२४ पर्यंतचे खास लूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लूक दरवर्षी चर्चेत असतो. दरवर्षी ते आपल्या पगडी, फेटा किंवा टोपीच्या माध्यमातून एक खास संदेश देण्याचा प्रयत्न करतात. मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत पगडी, फेटा किंवा टोपीची फॅशन चांगल्या प्रकारे फॉलो केली आहे.

गेल्या वर्षी भारताच्या विविध संस्कृतींचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदी बहुरंगी राजस्थानी फेटा परिधान करताना दिसले होते. दरम्यान, यंदा प्रजासत्ताक दिनाची थीम ‘इंडिया इज अ मदर ऑफ डेमोक्रसी’ म्हणजेच ‘भारत लोकशाहीची जननी’, अशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी परेडमध्ये ८० टक्के महिलांचा सहभाग होता आणि संपूर्ण कर्तव्य मार्गावर महिला शक्तीचे वर्चस्व पाहायला मिळाले.

२०२२ मध्ये पंतप्रधान मोदी वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसले. पंतप्रधानांनी उत्तराखंडची पारंपरिक टोपी परिधान केली होती. त्या टोपीवर एक पट्टी होती; ज्यावर ब्रह्मकमळ कोरलेले होते. सोबत एक शालही घेतली होती.

२०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप वेगळी पगडी घातली होती. त्या वर्षी पंतप्रधानांनी जामनगरच्या राजघराण्याकडून भेट म्हणून मिळालेली ‘हलारी पगडी’ घातली होती. तसेच, एक शाल घेतली होती आणि पांढऱ्या कुर्ता-पायजमावर राखाडी रंगाचे जाकीट घातले होते.

२०२० मध्ये कोविड काळातही पंतप्रधान मोदींनी भगव्या रंगाची पगडी घातली होती. त्या काळातही त्यांचा लूक खूपच प्रेक्षणीय दिसत होता आणि त्याची खूप चर्चा झाली होती.

२०१९ मध्येही पंतप्रधान मोदींच्या पगडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मोदी भगव्या रंगाचा फेटा घालून कर्तव्याच्या मार्गावर पोहोचले होते. हा फेटा पिवळ्या आणि लाल रंगाचा होता; जो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला.

२०१८ मध्ये पंतप्रधान मोदी बहुरंगी पगडीत दिसले. या पगडीला हिरवा, लाल, पिवळा, भगवा व निळा अशा रंगांचा मिलाफ होता. तसेच, त्यावर बांधणीची प्रिंट होती. पंतप्रधान मोदींनी काळ्या जॅकेटसह पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता.

२०१७ मध्ये पंतप्रधान मोदींनी गुलाबी रंगाचा फेटा घातला होता. त्यासोबतच त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि चुडीदार पायजमा घातला होता; ज्यावर त्यांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तपकिरी रंगाचा जोधपुरी पोशाख परिधान केला होता आणि त्यावर पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता. त्यांचा तो जोधपुरी लूक चाहत्यांना खूपच वेगळा आणि खास वाटत होता.

२०१५ चा प्रजासत्ताक दिन हा मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा पहिला प्रजासत्ताक दिन होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानी पगडी आणि रंगीबेरंगी बांधणीची डिझाइन असलेल्या फेट्यासह काळ्या रंगाचा सफारी सूट परिधान केला होता.