कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे असे नेहमी म्हटले जाते. कुठल्याही परिस्थिती न डगमगता कुत्रा माणसांची साथ देतो आणि त्यांचे रक्षणही करतो.परंतु, एखाद्या व्यक्तीची ओळख नसताना एखादा कुत्रा किंवा कुत्री कुणासोबत ७०० किलोमीटर पायी प्रवास करू शकेल का? कोझीकोडेहून शबरीमाला मंदिराकडे पायी तीर्थयात्रेवर निघालेल्या नवीनसोबत मालू नावाच्या एका कुत्रीने चक्क ७०० किलोमीटर प्रवास केला. त्यांच्या मैत्रीची ही कथा सध्या इंटरनेटवर सर्वत्र गाजत आहे.
दरवर्षी या हंगामात हजारो भाविक शबरीमाला मंदिरात अय्यप्पा स्वामींच्या दर्शनासाठी पायी निघतात. त्यापैकी एक असणाऱ्या नवीनसोबत ही चमत्कारिक कथा घडली. बेयपोर येथे राज्य विद्युत मंडळात काम करणाऱ्या नवीनने कोझीकोडेपासून आपली तीर्थयात्रा सुरु केली. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने त्याच्या लक्षात आले की एक कुत्री बऱ्याच वेळापासून त्याच्यासोबत चालत आहे. त्याला वाटले गावाची हद्द संपेपर्यंत ती चालेल आणि नंतर ती परतेल. परंतु तिने नवीनचा पिच्छा सोडला नाही. मग नवीन तिला त्याच्याजवळ असलेल्या पदार्थ खायला दिले तिला पाणी दिले आणि त्यांच्या मैत्रीला सुरूवात झाली आणि नवीनने तिचे नाव मालू असे ठेवले.
शबरीमाला येथे दर्शन घेताना नवीनला तिला एकटे सोडण्याचा प्रसंग आला. दर्शन घेऊन परतल्यानंतर नवीन मालूला शोधू लागला. ज्या लोकांनी मालू आणि नवीनला सोबत पाहिले होते त्यांनी सांगितले की तुमची कुत्री तुमचा शोध घेत आहे. दीड दिवसाच्या शोधानंतर त्या दोघांची भेट झाली. आता परत येताना सर्वात मोठा प्रश्न होता की मालूला घरी कसे घेऊन जायचे. त्यामुळे नवीनने तिला तिथेच सोडून जायचे ठरवले परंतु ती काही केल्या नवीनला सोडण्यास तयार नव्हती असे त्याने न्यूज मिनिटला सांगितले.
शेवटी नवीनने केरळा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि ४६० रुपयांचे तिकीट काढून बसने तिला घरी आणले. आता मालू नवीनच्या घरी राहते. तिला एक कार्डबोर्डचे घर करुन देण्यात आले आहे. मालूने पूर्ण प्रवासात माझी साथच दिली नाही तर तिने माझे रक्षण केले आणि प्रसंगी मला झोपेतून उठवण्यासाठी अलार्मदेखील बनल्याचे नवीनने म्हटले.