Vashi Hit And Run video viral: काही दिवसांपासून देशभरात हिट अॅण्ड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या हिट अॅण्ड रनच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पुणे, वरळी येथील हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर आता नवी मुंबईच्या वाशीमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामध्ये एका भरधाव इनोव्हा गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईत चालत्या रिक्षाला उडवलं

नवी मुंबई शहरातील वाशी सेक्टर ९ मध्ये शनिवारी दुपारच्या वेळी साईनाथ स्कूलसमोर एका निळ्या रंगाच्या इनोव्हा कारचालकाने दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक देत पळ काढला. आरोपी भगवत तिवारी हा अपघातानंतर फरारी झाला आहे. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचालक मुन्नालाल गुप्ता याचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला आहे.

थरारक CCTV समोर; ऑटोचालकाचा मृत्यू (Navi Mumbai Hit And Run)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरदिवसा रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू आहे. लोकांचीही वर्दळ या रस्त्यांवरून होताना दिसत आहे. यावेळी दोन रिक्षा येताना सुरुवातीला या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. याच वेळी अचानक मागून एक इनोव्हा कार भरधाव येत एका रिक्षाला उडवते आणि तशीच फरपटत घेऊन जाते. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये अक्षरश: कार आणि रिक्षाचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सीट पकडताना एस.टीची आणखी एक खिडकी तुटली; आता VIDEO पाहून सांगा नक्की चूक कुणाची?

चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचंही उघड

सध्या इनोव्हा कार पोलिसांच्या ताब्यात आहे. या घडलेल्या भीषण अपघाताबाबत वाशी पोलिस अधिक तपास करीत आहेत. अपघाताच्या ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिस ताब्यात घेतले असून, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली. आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक गोष्ट समोर आली. ज्या इनोव्हा गाडीने अपघात केला, ती भगवत तिवारी याच्या नावावर होती. मात्र, अपघात झाला त्यावेळी भगवत तिवारी बाजूच्या सीटवर बसलेला आणि त्याचा नातेवाईक सुभाष शुक्ला गाडी चालवत होता. सुभाष शुक्लाला गाडी चालवायला येत नव्हती. तसेच, सुभाष शुक्लाकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नसल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai hit and run case shocking video two arrested by police driver does not have driving license revealed in police investigation know all details srk