आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे. आज, १० मे रोजी भारतासह जगभरात ‘मदर्स डे’ उत्सहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. आजच्या या खास दिवशी राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही आपल्या आईच्या आवडीची गोष्ट करत यंदाचा मदर्स डे साजरा केला आहे.
रोहित पवार यांनी स्वयंपाक घरात आईच्या आवडीचा चहा तयार केला. माय लेकरांनी सोबत मिळून चहा प्यायलाही. रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, आईच्या आवडीचा चहा बनवायला किचनमध्ये गेलो. पण तिथेही मला आईची मदत घ्यावीच लागली. चहा तयार केला आणि भरलेला कप आईच्या हाती दिला. चहा चवीला साधारणच बनला होता पण ‘खूप सुंदर झाला’ असा आईचा प्रतिसाद होता.
रोहित पवार यांची फेसबूक पोस्ट –
दररोज आई आपल्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवते म्हणून आज मातृ दिनाच्या निमित्ताने आईच्या आवडीचं काहीतरी तयार करायचं ठरवलं. खाण्या-पिण्याबाबत आईची वेगळी अशी खास आवड नाही पण असेल ते आवडीने खायची सवय. पण तरीही थोडा विचार केला आणि सर्वांत सोपं म्हणून चहा बनवायला किचनमध्ये गेलो. पण तिथेही मला आईची मदत घ्यावीच लागली. आईसाठी नेहमी ज्या भांड्यात चहा तयार केला जातो त्या आजीने दिलेल्या भांड्यात आल्याचा चहा तयार केला आणि भरलेला कप आईच्या हाती दिला. चहा चवीला साधारणच बनला होता पण ‘खूप सुंदर झाला’ असा आईचा प्रतिसाद होता. चहा खरंच सुंदर झाला होता की मुलाने बनवला म्हणून सुंदर लागला ते आईलाच माहीत. पण यावरुन कळतं आई काय असते ते! #मातृदिवस
कशी झाली मदर्स डेची सुरुवात ?
आईला सन्मान देणारया मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुलं जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मदर्स डे ?
९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.