महाराष्ट्राच्या राजकारणातलं बडं नाव म्हणजे शरद पवार. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार चर्चेत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गटही पडले आहेत. या सगळ्या राजकारणाच्या घडामोडी सुरु असताना खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या लेकीचा म्हणजेच रेवतीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे आणि तिचं अभिनंदन केलं आहे.
काय आहे सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट?
आम्हा दोघांनाही तुझे आई वडील असल्याचा अभिमान वाटतो आहे. आमची मुलगी रेवतीने Masters (MPA) ही डिग्री घेतली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तिने मास्टर्स केलं आहे. खूपच छान वाटतं आहे आणि तिची या क्षणी खूप खूप आठवण येते आहे. या आशयाची फेसबुक पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.
रेवती सुळे कोण आहेत?
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत. तर शरद पवार हे त्यांचे आजोबा आहेत. सुप्रिया सुळे या अनेकदा सोशल मीडियावर मुलगी रेवतीचं कौतुक करत असतात. आता त्यांच्या मुलीने म्हणजेच रेवतीने मास्टर्स ही डिग्री मिळवल्याबद्दलही सुप्रिया सुळेंनी तिचं कौतुक केलं आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातलं वडील मुलीचं नातं आणि त्या नात्यातलं हळवेपण अनेकदा दिसून आलं आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जे भाषण केलं होतं त्यात, ‘बापासाठी लेक म्हणजे नारळाचं पाणी’ ही कविताही म्हटली होती. तसंच त्या दोघांमधले भावनिक प्रसंगही कधी कधी कॅमेरात कैद होत असतात. राजकारणी हा राजकारणी असला तरीही तो माणूस असतो याची जाणीव असे प्रसंग करतात. सुप्रिया सुळे यांचं त्यांच्या मुलीशीही अगदी असंच नातं आहे. एका आईने आपल्या मुलीचं केलेलं कौतुक हेच ही पोस्ट सांगून जाते आहे.