साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीआधीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांनी दूर्लक्ष केल्याने पक्षाला गळती लागल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे पक्षामधील अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेची वाट धरल्याने अधिक पडझड होऊ नये या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच सातारा मतदारसंघाला भेट दिली. उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्याने आता साताऱ्यामध्ये पवारांचेच वर्चस्व राहणार की उदयनराजे पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे महाराष्ट्राबरोबरच सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवली आहे. त्यातच आता २१ तारखेला म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या दिवशीच साताऱ्यात पोटनिवडणूक होणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळेच येथे दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. सोशल मिडियावरही दोन्ही पक्षांचे समर्थक प्रचारात गुंतल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे सातारा दौऱ्यात असताना तरुणाईने त्यांचे कशाप्रकारे स्वागत केले हे दिसून येत आहे. ‘कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला’ अशा घोषणा राष्ट्रवादीच्या समर्थकांनी दिल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा