फक्त दहा रुपयांत कपडेलत्ते आणि भांडी विकणारे दुकान कधी पाहिले आहेत का? मग तर तुम्हाला लुधीयानातल्या ‘नेकी की दुकाना’बद्दल जाणून घ्यायलाच हवं. गरिबांसाठी शक्य असतील तेवढ्या जीवनावश्यक वस्तू फक्त दहा रुपयांत या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या जातात.
लुधीयानामधल्या एका स्वयंसेवी संस्थेने हे दुकान सुरू केले आहे. या भागात अनेक गरिब कामगार राहतात ज्यांच्याकडे कपडे, भांडी आणि इतर वस्तू घेण्याएवढे पैसे नसतात. या गरजूंना मदत करण्याच्या हेतूने इथल्या एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत जानेवारी महिन्यात हे दुकान सुरू केले होते. कपडे, भांडी, चपला, पुस्तक, खेळणी यासारख्या अनेक जीवनावश्यक वस्तू फक्त दहा रुपयांत इथे विकल्या जातात. सध्याच्या महागाईच्या काळात अनेकांना कपडे, भांडी अशा वस्तू घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी ‘एक नूर सेवा केंद्र’ने पुढाकार घेऊन हे दुकान सुरु केले.
वापरलेल्या वस्तू इथे कमी किमतीत विक्रीसाठी ठेवल्या जातात. पण या सेवाचा कोणी गैरवापर करू नये यासाठी आधार कार्ड पाहूनच मग वस्तू दिल्या जातात. एका महिन्यात फक्त पाचवेळाच इथून वस्तू घेऊ शकतात. या प्रत्येकाची नोंदणी करण्यात येते. दरदिवशी ६ ते ७ असे तासाभरासाठी हे दुकान खुले असते. ‘माणुसकीची भिंत’ या संकल्पनेतून हे दुकान सुरू करण्यात आले आहे.
वाचा : शौचालय बांधण्यासाठी राबणाऱ्या गरोदर सुशीलाचा पंतप्रधान मोदी करणार सन्मान