सध्या देशभरात आणि जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा विश्वचषक अंतिम सामन्यात खेळणार आहे. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात तडाखेबाज ३५९ धावा फटकावल्या होत्या. भारताचा त्या सामन्यात पराभव झाला होता. यंदा मात्र भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात असताना मिचेल मार्शनं सहा महिन्यांपूर्वी केलेलं एक भाकित व्हायरल होत आहे. त्या भाकिताचा नेटिझन्सकडून मीम्सच्या माध्यमातून पुरेपूर समाचार घेतला जात आहे!
काय होतं मिचेल मार्शचं भाकित?
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शनं मे महिन्यात एका पॉडकास्टमध्ये बोलताना “भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामना होईल” असं भाकित वर्तवलं होतं. त्याचं हे भाकित खरं ठरलं असलं, तरी त्याचबरोबर त्यानं भारताच्या पराभवाचंही भाकित केलं आहे. “ऑस्ट्रेलिया २ बाद ४५० तर भारत सर्वबाद ६५ धावा असतील”, असंही तो म्हणाला आहे. शिवाय, ऑस्ट्रेलिया संघं यंदाच्या विश्वचषकात अजेय राहील, असंही भाकित मार्शनं वर्तवलं होतं.
Ind vs Aus Final चं भाकित व्हायरल, मार्शनं स्कोअरकार्डच सांगितलं; म्हणे, “ऑस्ट्रेलिया ४५०…!”
“एवढा आत्मविश्वास कधीच पाहिला नाही!”
दरम्यान, आता मिचेल मार्शचं हे भाकित पुन्हा व्हायरल होत असून त्यावर नेटिधन्सकडून मीम्स व्हायरल केले जात आहेत. काहींनी “चरस पीते हो क्या?” असा प्रश्न करणारं मीम पोस्ट केलं आहे.
तर काहींनी “एवढा आत्मविश्वास असणारा माणूस कधी पाहिला नाही”, अशी टिप्पणी केली आहे!
काही युजर्सनी तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कराव्या लागलेल्या संघर्षाची मार्शला आठवण करून दिली आहे. “यांना (केशव) महाराज आणि (तबरेज) शम्सी आवरेनात. आणि हे बोलतायत जडेजा, कुलदीप, शमी, सिराज आणि बुमराहसमोर ४५० धावा करण्याबाद्दल! गेल्या २ सामन्यांमध्ये पॅट कमिन्सनं मिचेल मार्शपेक्षा जास्त डोकं लावून फलंदाजी केली आहे”, अशी पोस्ट एका युजरनं एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे.
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात नेमकं काय होईल? दोन्ही संघांच्या जमेच्या व कमकुवत बाजू कोणत्या? कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील? यावर चर्चा होताना दिसत आहेत.