नोटाबंदीनंतर एटीएमच्या रांगा लावत आपण सगळेच त्रासलेलो असलो तरी आपल्या देशातल्या या बदलत्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत करिअरची अनेक नवीन क्षेत्रं खुली होणार आहेत. पाहुयात नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या करिअरच्या नव्या संधी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१.डिजिटल सिक्युरिटी आर्किटेक्ट

नोटांबंदीनंतर आपल्याकडे कॅशलेसचा जमाना आला आहे. पण भारतातले सायबर सिक्युरिटीसंदर्भातले नियम आणि कायदे तितकेसे कडक नाहीत. असं असताना लाखो भारतीयांची वैयक्तिक तसंच आर्थिक माहिती हॅकर्स चोरू शकतात.

हॅकर्सच्या या उद्योगांना डिजिटल सिक्युरिटी आर्किटेक्ट आळा घालू शकतो. तुमच्या घरचा काँप्युटर आणि स्मार्टफोन सुरक्षित करण्यापासून मोठमोठ्या जागतिक कंपन्यांची डिजिटल नेटवर्क्सची ‘सुरक्षा यंत्रणा’ तयार करण्याचं काम डिजिटल सिक्युरिटी आर्किटेक्ट करतात. परदेशात या क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ उपलब्ध आहेत. भारतातही अनेक डिजिटल सिक्युरिटी आर्किटेक्ट आहेत. पण आता नोटाबंदीमुळे भारतात या तज्ज्ञांना मोठ्या प्रमाणावर मागणी येणार आहे.

आवश्यक क्षमता -डिजिटल सुरक्षेची जाण, कंपन्यांच्या व्यवहाराची योग्य माहिती. ‘डिझाईन थिंकिंग’ करण्याची क्षमता. अॅप आणि वेबसाईट डिझाईनिंग खोलवर जाण.

२.बायोमेट्रिक प्रोग्रॅमर्स

भारतात निरक्षरतेचं प्रमाण प्रचंड आहे. डिजिटलायझेशन झाल्यावर लोकसंख्येचा हा मोठा हिस्सा निरक्षरतेमुळे हे तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे वापरू शकणार नाही. अशा वेळी हे व्यवहार बायोमेट्रिक डेटा वापरून त्यांच्यासाठी सोपे करता येऊ शकतात. आधार कार्ड काढताना घेतलेला डोळ्यांचा स्कॅन हे बायोमेट्रिक ओळखीचं एक उदाहरण आहे. अंगठ्याचा ठसा घेतात तशाच पध्दतीने डोळ्यांमधल्या रेटिनाचा स्कॅन करत एखाद्या निरक्षर व्यक्तीला डिजिटल व्यवहार करता येऊ शकेल.

यामुळेच आता बायोमेट्रिक प्रोग्रॅमर्सना मोठी मागणी येणार आहे. या प्रोगॅमर्सना त्यांचं टेक्निकल ज्ञान वापरत अनेक किचकट सामाजिक प्रश्न सोडवायला हातभार लावता येऊ शकेल. हे करताना स्थानिक भाषांचंही ज्ञान या प्रोग्रॅमर्ससाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
“अशा तज्ज्ञांची भारतात सध्या कमतरता आहे. त्यामुळे सध्यातरी या क्षेत्रातल्या कंपन्या टेक्निकल ज्ञान असणाऱ्या लोकांना आणखी ट्रेनिंग देत आहेत” एफसीएम ट्रॅव्हल सोल्युशन्सचे रक्षित देसाई म्हणाले
कामाचं स्वरूप- स्थानिक भाषामध्ये काँप्युटर प्रोग्रॅम्स तयार करणे.

आवश्यक क्षमता- रोबोटिक्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचं ज्ञान असणाऱ्यांना या क्षेत्रात चांगला वाव आहे. स्थानिक भाषा आणि सामाजिक प्रश्नांविषयी जाणिवेची जोड असल्यास आणखी उत्तम.

३.डिजिटल चँपियन्स

एखाद्या कंपनीची बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा व्हिजन तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे डिजिटल चँपियन्स करतील. डिजिटल चँपियन्स हे काही त्या पदाचं अधिकृत नाव असेलच असं नाही. पण असं काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना टेक्निकल ज्ञानासोबत कंपनी स्ट्रॅटेजीचीही जाण असणं आवश्यक असणार आहे. कंपनी मॅनेजमेंटच्या डोक्यात असलेली एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे डिजिटल चँपियन्स करतील. कंपनीचं दैनंदिन कामकाजही तंत्रज्ञानातल्या नव्या कल्पना वापरून सोपं करण्याचं काम या चँपियन्सवर असेल

कामाचं स्वरूप- कंपनीतल्या स्ट्रॅटेजी मेकर्सशी योग्य संवाद राखणं. टेक्नॉलॉजिकल ज्ञान अतिशय ‘अप-टू-डेट’ ठेवणं. कंपनीचे प्लॅन्स प्रत्यक्षात उतरवायला मदत करणं

आवश्यक क्षमता- बिझनेस आणि तंत्रज्ञानाची व्यवस्थित जाण. एमबीए डिग्री आणि ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करण्याची क्षमता

४. डिजिटल एक्झेक्युटिव्ह

डिजिटल ट्रेंड्सवर नजर ठेवत डिजिटायझेशनविषयी धोरणात्मक विचार करू शकणाऱ्यांना येणाऱ्या काळात मोठी मागणी येणार आहे. आपल्या या क्षमतांचा वापर करत कंपन्यांच्या कामात गुणात्मक सुधारणा हे प्रोफेशनल्स करू शकतील

“डिजिटल इकॉनॉमीच्या काळात या पध्दतीने विचार करत पुढे जाणाऱ्यांना महत्त्व येणार आहे” महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रिन्स ऑगस्टीन म्हणाले. अॅनॅलिटिक्सवर अवलंबून असणाऱ्या मार्केटिंगचा अनुभव असणं या पदांसाठी फायदेशीर ठरेल
कामाचं स्वरूप – ग्राहक आणि कंपन्याचंचे एकमेकांशी होणारे व्यवहार सुलभ करणं. एखादं प्रॉडक्ट उत्पादन झाल्यापासून ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंतची प्रक्रिया आणखी सुसूत्र करणं. एखादं प्रॉडक्ट ग्राहकाला हवंसं वाटेल असं ‘प्रॉडक्ट डिझाईनिंग’ करणं

आवश्यक क्षमता- उत्पादन प्रक्रियेचं आणि ग्राहकांच्या आवडींचं आणि ‘बिहेविअर’चं योग्य ज्ञान असणं. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी प्रोफेशनल्सना या नव्या संधींचा चांगला फायदा घेता येईल.

५.आर्थिक गैरव्यवहारविरोधी अधिकारी

या प्रकारचे अधिकारी आताही आहेत. पण नोटाबंदीनंतर अशा क्षेत्रात जाणाऱ्यांना आणखी स्किल्स मिळवावी लागतील. नोटाबंदीनंतर कायदेशीर मार्गानेही चतुराईने आर्थिक गैरव्यवहार झाल्याची उदाहरणं समोर आली होती. अशा व्यवहारांना आळा घालायचं काम हे अधिकारी करतील

आवश्यक क्षमता- तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहारांची जाण. नोटाबंदीनंतर नव्याने निर्माण होणाऱ्या ‘चोरवाटांची’ ओळख

संकटातच सुवर्णसंधी असते म्हणतात तसंच काहीसं सध्याच्या या बदलत्या परिस्थिती समोर येतंय. सध्या तरी एटीएमच्या रांगेत उभं राहण्याशिवाय पर्यंय नाहीये.पण याही परिस्थितीत आसपास घडणाऱ्या घडामोडींचा कानोसा घेत स्वत:ला ‘फ्युचर रेडी’ करत राहणंही प्रचंड महत्त्वाचं आहे. जमाना डिजिटल है बॉस!