नोटाबंदी झाल्यापासून नोटाबाबत अफवांचे जे पीक जोर धरत आहे ते काही केल्या कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. २००० च्या नव्या नोटेमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असेल आणि त्यामुळे सॅटेलाइटद्वारे नोटांचा माग तुम्हाला ठेवता येऊ शकेल अशी एक अफवा होती.
जर तुम्ही नोट १२० मीटर खोल जरी पुरून ठेवली तरी ती सापडू शकेल असे म्हटले गेले होते. परंतु, काही दिवसानंतर ती अफवा होती हे उलगडले. आता एका नव्या अफवेने बाजारात जोर धरला असून ती ऐकून हसावे की रडावे हेच कळणार नाही. काही वेबसाइट्सने असे म्हटले आहे की नव्या नोटा फॉस्फोरसचा रेडिओ आयसोटाइपवरुन छापण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १५ प्रोटोन आणि १७ न्यूट्रॉन असतात. ही नवी छपाई एखाद्या इंडिकेटरप्रमाणे काम करते. त्यामुळे जर एकगठ्ठा कुठे नोटा ठेवण्यात आल्या असतील तर त्या चमकतात.
त्यामुळेच आयकर विभाग इतक्या प्रमाणात नोटा पकडण्यात यशस्वी झाल्याचे या वेबसाइट्सने म्हटले आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू या शहरात आयकर विभागाने छापे मारून कोट्यवधी किमतीच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. या गोष्टीचा संदर्भ देऊन या अफवा पसरविण्यात येत आहे.
या नव्या नोटातील रेडिओअॅक्टिव आयसोटोप हे शरीराला हानीकारक नसल्याचे म्हटले आहे. नव्या नोटातील टी हाफ काही दिवसांनी क्षीण होऊन जाईल त्यामुळे येणाऱ्या काळात या नव्या नोटादेखील बंद केल्या जातील असा जावईशोध या वेबसाइटने लावला आहे.
नव्या नोटा आयकर विभागाने जप्त केल्या आहेत हे जरी खरी असले तरी या तथ्यांच्या आजूबाजूला ज्या अफवा पेरल्या जात आहे त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होण्याचा संभव आहे. या नोटा एखादी इलेक्ट्रॉनिक चीप किंवा रेडिओअॅक्टिव शाईमुळे पकडल्या जात नसून गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पकडल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात व्हाट्सअॅप आणि फेसबुकवर या अफवा खूप शेअर केल्या जात आहेत.