डांबरी, सिमेंट काँक्रिट, अल्ट्रा थीन व्हाइट टॅपिंग, खाली काँक्रिटचा थर आणि वर डांबरी रस्ता आतापर्यंत आपल्या देशात अशाच पद्धतीने रस्ते बनवले जात असल्याचं तुम्ही पाहिलं आहे. पण नव्या प्रयोगाची भर पडणार आहे. नवीन रस्ते तयार करण्यासाठी जुना रस्ता खोदून त्यातून निघालेल्या ढिगाऱ्याचा नवीन रस्त्याच्या उभारणीसाठी वापर केला जाणार आहे. या नव्या प्रगोयाच्या रस्त्यांसाठी तयारी सुद्धा सुरू झालीय. CRII च्या नव्या टेक्नॉलॉजीने एक चांगला प्रयत्न सुरु केलाय. या टेक्नॉलॉजीमध्ये रस्त्यांच्या जुन्या भंगारातून नवीन रस्ता तयार केला जाणारेय. या पद्धतीमुळे बरेच फायदे सुद्धा मिळणार आहेत. प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल. तसंच रस्त्याच्या कामातून निघालेल्या कचऱ्याचा पुर्नवापर सुद्धा करण्यात येईल.
रस्ताबांधणी व देखभाल दुरुस्तीची कामे करताना अनेकदा खडी आणि रेती उपलब्ध होण्यात अडचणी येतात. काही वेळा तर रेती आणि खडी उपलब्ध होताना काही अडचणी येतात; परंतु जुन्या रस्त्याच्याच मूळ घटकांचा पुनर्वापर केल्यास नव्याने खडी आणि रेती आणण्याची गरज भासणार नाही. नेमका हाच प्रयत्न आता करण्यात येतोय. सीआरआरआयने रस्त्यांचा विकास करण्यासाठी एक चांगला पुढाकार घेतला आहे, जो संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणार आहे. या नव्या टेक्नॉलॉजीने तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल फोटोमध्ये या नव्या टेक्नॉलॉजीने रस्ता कसा चांगला बनवला जात आहे, हे दाखवण्यात आलंय.
सीआरआरआयच्या या नव्या टेक्नॉलॉजीनुसार सुरूवातीला जुन्या रस्ता खोदून त्यातून निघणाऱ्या मातीसह इतर सर्व गोष्टींचा ढिगारा बनवला जातोय. यानंतर रस्ता दुरुस्त केला जातो. मग जुन्या रस्त्याच्या खोदकामातून निघालेल्या ढिगाऱ्यापासूनच रस्त्याचं रिसायकलींग केलं जातं. जुना रस्ता उखडल्यानंतर तेथील डांबर व अन्य मिश्रण टाकून न देता त्याचाच वापर नव्याने रस्ता तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी बाहेरून कोणताही माल न आणताच नवा रस्ता तयार करणे शक्य होईल. परिणामी रस्तेबांधणी अधिक पर्यावरणपूरक होणे शक्य होणार आहे. या पद्धतीत खूप कमी खर्च लागणार आहे. तसंच प्रदूषणही खूप कमी आहे.
रस्त्यांचे मूळ घटक उखडल्यानंतर या मिश्रणाचे ‘रिसायकलिंग’ केलं जाईल आणि त्यातून नव्याने तयार होणाऱ्या मिश्रणाचा वापर तोच रस्ता नव्याने निर्माण करण्यासाठी केला जातोय. नव्याने खडी आणण्याची गरज नसल्याने दगडखाणींमधून होणारे उत्खननही कमी होऊ शकेल. त्यामुळे जुन्या रस्त्यांच्या मूळ घटकांचा पुनर्बांधणीसाठीचा वापर अधिक पर्यावरणपूरक ठरेल. या पुननिर्मितीच्या प्रस्तावावर सध्या काम सुरू आहे. येत्या वर्षभरात यासाठीची उपकरणे उपलब्ध होतील. त्यानंतर काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर अशा प्रकारे जुन्या घटकांचाच पुनर्वापर करून रस्त्यांची पुनर्बांधणी केली जाईल. हे प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर करणे शक्य होईल.