तुम्ही हॉलीवूडचे साय फाय चित्रपट पाहिलेच असतील. तंत्रज्ञानावर आधारित जग, जिथे कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनुष्याची गरज भासणारच नाही.. सारं काही तंत्रज्ञानाच्या भरवश्यावर. आतापर्यंत हॉलीवूडच्या चित्रपटात किंवा एखाद्या कांदबरीत दिसणारे हे साय फाय जग आता हळूहळू प्रत्यक्षात पाहायला मिळालं तर नवल वाटायला नको. न्यूयॉर्कस्थित एक आर्किटेक्चर फर्म अशी इमारत बनवणार आहे जी आकाशातून जमिनीवर बांधली जाणार आहे. थोडक्यात काय साधरण हवेत तरंगणारी ही इमारत असणार आहे.
क्लाऊड आर्किटेक्चर कंपनीने या अनोख्या इमारतीचे डिझाइन तयार केले आहे. या टॉवरला त्यांनी ‘अॅनालेमा टॉवर’ असे नावही दिले आहे. जर अशी इमारत बांधायला घेतलीच तर नक्कीच ती जगातील एकमेव अनोखी इमारत ठरेल. पृथ्वीपासून ही इमारात पाच हजार किलोमीटरवर असणार आहे. सध्या तरी दुबईमध्ये ही इमारत तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. इथे अनेक गगनचुंबी इमारती आहेत त्यामुळे अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार करण्याचा मानस आहे कारण इथे इमारत बनवण्याचा खर्चही कमी असणार आहे. या इमारतीत राहणा-या लोकांसाठी सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीही करण्यात येणार आहे.