कधी मित्रमैत्रीणींसोबत हँगआऊटला तर कधी कुटुंबाबरोबर साप्ताहिक सुटी साजरी करण्यासाठी आपण अगदी सहज एखाद्या रेस्तराँमध्ये जातो. त्याठिकाणी आपण वारंवार गेलो तर आपल्याला काही विशेष सुविधा देण्यात येतात. नेहमीचे ग्राहक म्हणून आपली ओळख रहावी आणि पैसे भरणे सोयीचे व्हावे यासाठी केएफसी या फूड चेनने चीनमध्ये एक अनोखा प्रयोग सुरु केला आहे.
याठिकाणी तुम्हाला कोणताही पदार्थ विकत घेण्यासाठी केवळ एक स्माईल द्यावी लागणार आहे. आता हे काय नवीनच…असे तुम्हाला अगदी सहज वाटेल. पण तंत्रज्ञानाच्या साह्याने ‘स्माईल टू पे’ ही नवीन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. एका मोठ्या स्क्रीनवर तुमच्या चेहऱ्याची नोंद केली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेला पदार्थ तुम्ही त्याठिकाणी ऑर्डर करु शकता. इंटरनेट बँकींगव्दारे तुम्हाला याठिकाणी पैसे भरता येणार आहेत. स्क्रीनवर घेण्यात आलेल्या चेहऱ्याच्या फोटोवरुन तुम्हाला वेटरमार्फत तुमचा पदार्थ आणून दिला जाणार आहे.
रेस्तराँमध्ये एकदा येऊन गेलेला ग्राहक पुन्हा आला तर त्याला ओळखणे यामुळे सोपे होणार आहे. अशाप्रकारे तुमची ओळख पटण्यासाठी एक नवीन आणि वेगळा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही तुमची हेअरस्टाईल, मेकअप बदलले असेल तरीही तुमच्या चेहऱ्याच्या बेसिक वैशिष्ट्यांनुसार तुमची ओळख या तंत्राव्दारे पटणार आहे. या तंत्रज्ञानामार्फत नोंदणी करुन घेण्यात आलेली कोणत्याही माहितीचा गैरवापर होऊ शकत नाही. कारण याठिकाणी डेटा सेव्ह होण्याचे तंत्र विकसित करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरणे सुरक्षित असेल असे यंत्र तयार करणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे.