नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त अनेकांनी बाहेर, विविध ठिकाणी जाऊन; तर काहींनी आपल्या घरात जवळच्या व्यक्तींसोबत किंवा मित्रपरिवारासोबत पार्ट्यांचे आयोजन केले होते. अशात वर्षाच्या शेवटच्या दिवशी फूड डिलिव्हरी अॅपवरून बरेच खाद्यपदार्थसुद्धा मागवले गेले आहेत. मात्र कोलकात्यामधील एका व्यक्तीने झोमॅटोद्वारे एकाच वेळी चक्क १२५ ऑर्डर्स दिल्या होत्या. या ऑर्डरने कंपनीचे सीईओ दीपेंद्र गोयल यांचेही लक्ष वेधले गेले. इतकेच नव्हे, तर “मलासुद्धा या पार्टीत सहभागी व्हायचं आहे,” असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
“मला खरंच कोलकातामधल्या या पार्टीचा भाग व्हायचं आहे; जिथे एकाने एकाच वेळी चक्क १२५ पदार्थांची ऑर्डर दिली आहे,” असे लिहून आपल्या @deepigoyel एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरील अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. अर्थात, त्यावर अनेक एक्स वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, या १२५ ऑर्डर्समध्ये नेमके काय काय पदार्थ मागवले आहेत आणि ते घेऊन जाण्यासाठी किती कर्मचारी लागणार आहेत? याची उत्सुकता सर्वांना होती.
हेही वाचा : नवीन वर्ष म्हणून दररोज सकाळी चालायला जायचा संकल्प केलाय? मग या पाच महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; टिप्स पाहा…
“एवढे पदार्थ घेऊन जाण्यासाठी किती डिलिव्हरी कर्मचारी लागणार आहेत?” असे यश देसाई नावाच्या व्यक्तीने विचारले असता, “फक्त एक व्यक्ती. आताच सर्व ऑर्डर्स तपासल्या तेव्हा समजलं, ‘१२५ रुमाली रोटी’ अशी ऑर्डर दिलेली आहे,” असे उत्तर दीपेंद्र गोयल यांनी दिले.
त्यासोबतच झोमॅटोच्या अधिकृत एक्स अकाउंटनेसुद्धा दीपेंद्र गोएल याच्या पोस्टवर “इथे पार्टी आहे की भंडारा?,” अशी मिश्कील प्रतिक्रिया दिल्याचे दिसते.
झोमॅटो कंपनीच्या सीईओने ३१ डिसेंबरच्या दिवशी मिळालेल्या ऑर्डर्सची आकडेवारीही शेअर केली होती. “भारतातील इतर राज्यांपेक्षा सर्वांत जास्त ऑर्डर्स महाराष्ट्र राज्यातून येत आहेत. एवढंच नाही, तर ३१ डिसेंबरला सर्वाधिक ऑर्डर्स दिल्या गेल्या आहेत,” असे सांगितले आहे.
“सर्व वापरकर्त्यांचे मी खूप आभार मानतो आणि ज्यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे अशा आमच्या डिलिव्हरी पार्टनर्स आणि हॉटेल पार्टनरचे विशेष आभार,” असेही झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी म्हटले आहे.