नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेचजण वेगवेगळे संकल्प करतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यू इयर रेझोल्यूशन करणं आणि नंतर काही दिवसांमध्येच मोडणं ही फार साधारण गोष्ट झाली आहे. अनेकांना तर रेझोल्यूशन पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अनेजण वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोक व्यायामशाळा, योग अभ्यास किंवा मॉर्निंग वॉकला जाण्याचा संकल्प करतात. मात्र संकल्प करणाऱ्या बहुतांश लोकांना संकल्प पूर्णत्वास नेता येत नाहीत. तुमच्याही ओळखीत असे अनेकजण असतील ज्यांना संकल्प पूर्णत्वास नेता येत नाही. अशाच एका रेझोल्यूशनबद्दल आता महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी ट्विटरवरुन एक भन्नाट मीम शेअर केलं आहे.
आनंद महिंद्रा हे ट्विटरवर फारच सक्रीय आहेत. अनेक ट्रेण्डींग विषयांवर आणि घडामोडींवर ते ट्विटरवरुन भाष्य करत असतात. न्यू इयर रेझोल्यूशनबद्दल त्यांनी शेअर केलेले मीम तुम्हालाही फारच रिलेटेबल वाटेल यात शंका नाही. या मीममध्ये एक जानेवारी रोजी अगदी उत्साहात व्यायामास सुरुवात करताना दिसत आहे. चार तारखेला हीच व्यक्ती थकुन झोपताना दिसत नाही. आनंद महिंद्रांनी हे मीम शेअर करताना, “नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्याच्या मध्यात पोहचेपर्यंत असं काहीतरी वाटू लागतं…” अशी कॅप्शन दिली आहे. या ट्वीटला ट्विटरवर भन्नाट प्रतिक्रिया मिळत आहेत. या ट्वीटला १ लाख ७८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
महिंद्राच्या या ट्वीटवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या असून एका युझरने, “तुमचं सेन्स ऑफ ह्यूमर भन्नाट आहे. मी सुद्धा तुमचं हे क्लब जॉइन केलं आहे. नवीन वर्षाचा संकल्प तोडण्यासंदर्भातील ही पोस्ट फारच रंजक आहे,” असं म्हटलं आहे. एकाने व्यायामाला शिक्षा नाही तर मस्तीसारखं पाहिलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. तारखा पाहून केलेले संकल्प कधीच यशस्वी होत नाही, असंही एकाने म्हटलं आहे. मला वाटलं होतं की तुम्ही आमच्याहून वेगळे आहात पण तुम्ही तर आमच्यासारखेच निघालात, असं अन्य एकाने म्हटलं आहे.
आनंद महिंद्रांनी याच वर्षाच्या पहिल्या दिवशी एक ट्वीट केलं होतं ज्यामध्ये त्यांनी आपण नवीन वर्षाचा संकल्प करत नाही असं म्हटलेलं. या ट्वीटबरोबर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये एक महिला खडूने फळ्यावर चित्र काढताना दिसत आहे. महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करताना, “नवीन वर्षात नक्कीच चढ-उतार असतील. मात्र मी अपेक्षा करतो की या सर्व नाकारात्मक गोष्टींचा वापर आपल्या आतमधील सरकारात्मक बदल करण्यासाठी कराल. मी वाईट काळाचा वापर अधिक सक्षम होण्यासाठी आणि माझ्या मनाला अधिक विचारपूर्वकपणे सक्रीय करण्यासाठी करेल,” असं म्हटलेलं.