यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड संघ हा विजेतेपदासाठीचा दावेदार मानला जातो. न्यूझीलंडच्या संघाची स्पर्धेतली कामगिरीही या मानण्याला साजेशी अशीच ठरली आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा संघ आणि संघातील सर्व खेळाडू चर्चेचा विषय ठरले आहेत. या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवरही क्रिकेट चाहते चर्चा करताना दिसत आहेत. या चर्चेमध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र याचा. रचिन सुरुवातीपासूनच त्याच्या नावामुळे चर्चेत राहिला आहे. त्यापाठोपाठ त्याच्या कामगिरीचीही चर्चा झाल्यानंतर आता रचिनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
रचिन रवींद्रच्या नावाचं विशेष
रचिन रवींद्रच्या नावाची बरीच चर्चा पाहायला मिळाली. त्याचं नाव भारताचे दोन महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावांना एकत्र करून ठेवण्यात आलं आहे. राहुल द्रवीडमधला RA आणि सचिनच्या नावातला CHIN असं मिळून त्याचं नाव रचिन असं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचं भारताशी विशेष असं नातं तयार झालं आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय माता-पित्यांच्या पोटी जन्मलेला रचिन लहानपणी दरवर्षी भारतातील त्याचं आजोळ असणाऱ्या बंगळुरूमध्ये येत असे. तिथे तो क्लब क्रिकेटही खेळत असे.
वर्ल्डकपमध्ये गाजतंय रचिनचं नाव!
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रचिन रविंद्रचं नाव वर्ल्डकपमध्ये चांगलंच गाजतंय. वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्धचा लीग फेरीतील शेवटचा सामना झाल्यानंतर रचिन रविंद्रच्या खात्यावर ९ इनिंग्जमधून ५६५ धावा जमा आहेत. त्यात दोन अर्धशतक व तब्बल तीन शतकांचा समावेश आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, हा त्याचा पहिलाच वर्ल्डकप आहे.
रचिन रविंद्र आजोळी, आजीनं काढली दृष्ट!
दरम्यान, गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यामुळे न्यूझीलंडचं सेमीफायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. पाकिस्तानला ते स्थान मिळवण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जादुई विजयाची आवश्यकता असेल. न्यूझीलंडच्या विजयानंतर रचिन रविंद्र बंगळुरूमधील आपल्या आजोळी गेला होता. यावेळी त्याच्या आजीने त्याची दृष्ट काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी तो शेअरही केला आहे.
रचिनच्या या व्हिडीओमध्ये भारतीयांमध्ये तो आणखीनच चर्चेचा विषय झाला आहे.