मागील काही दिवसांपासून विमान प्रवासादरम्यान घडणाऱ्या विचित्र घटना तुम्ही पाहिल्या असतील. अशीच एक नवी घटना आता सिंगापूर एअरलाइन्समधून समोर आली आहे. न्यूझीलंडमधील एक जोडपं सिंगापूर एअरलाइन्सनं प्रवास करीत होतं. मात्र, या प्रवासादरम्यान कुत्र्याचा त्रास सहन करावा लागल्यानं जोडप्यानं विमान कंपनीकडून तिकिटाचे पैसे परत मागितले आहेत. जोडप्याचं हे कारण ऐकून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, युजर्सही यावर बरीच चर्चा करीत आहेत.
सतत भुंकणाऱ्या व रडणाऱ्या कुत्र्याच्या शेजारी बसून, त्यांना आपला प्रवास करावा लागला, असं त्या जोडप्याचं म्हणणं आहे. त्यामुळे १३ तासांचा प्रवास अगदी त्रासदायक झाला, असंही ते म्हणाले. न्यूझीलंडच्या स्टफ मीडियानुसार, हे जोडपं वेलिंग्टनचे रहिवासी असून, त्यांची ओळख गिल आणि वॅरेन प्रेस, अशी झाली आहे. हे दोघेही जूनमध्ये युरोपमधून न्यूझीलंडला परतत होते. पॅरिस ते सिंगापूर १३ तासांच्या फ्लाइटमध्ये ते बसले होते तेव्हा त्यांना हा कुत्र्याचा त्रास सहन करावा लागला.
त्यावर जोडप्यानं सांगितलं की, आमच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाबरोबर एक कुत्राही होता; जो पाहून आम्हाला आश्चर्यच वाटलं. तो कुत्रा सतत आवाज करीत होता आणि झोपल्यानंतरही घोरण्याचा जोरदार आवाज काढत राहिला. यावेळी मला वाटलं की, पतीचा फोन वाजतोय; पण जेव्हा खाली वाकून बघितलं तेव्हा दिसलं की, कुत्रा जोरजोरात श्वास घेत होता. यावेळी आम्ही विमानातील क्रू मेंबरकडे तक्रार केली आणि सांगितलं की, आम्ही संपूर्ण प्रवासात कुत्राच्या शेजारी बसू शकत नाही. या परिस्थितीत त्यांची जागा बदलण्याची मागणी केली.
त्यावर केबिन क्रूनं सांगितलं की, इकॉनॉमी क्लास विभागात मागच्या बाजूची एकच सीट रिकामी आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही जोडप्याला आपल्या आहे त्या जागेवर बसावं लागलं. पण, अर्ध्या विमान प्रवासानंतर कुत्र्याच्या वागणुकीचा सामना करणं त्या दोघांना कठीण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या जोडप्यानं पुढे सांगितलं की, कुत्रा गॅस सोडत होता; त्यामुळे तिथे बसणं खूप त्रासदायक झालं होतं. महिलेच्या म्हणण्यानुसार, कुत्रा पतीच्या पायावर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी कुत्र्याच्या तोंडातून गळणारी लाळ त्याच्या पायाला लागत होती. याबाबत ज्या व्यक्तीचा तो कुत्रा होता, त्याच्याकडे तक्रारही केली; पण तोही काही करू शकला नाही. त्यावर जोडप्यानं सांगितलं की, हा त्यांचा विमान प्रवासाचा सर्वांत वाईट अनुभव होता.