सध्या न्यूझीलंडमधील एका महिला अँकरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. रोज टीव्ही किंवा सोशल मीडियावर अँकरिंग करताना आपण अनेक जण पाहतो. काही जणं आरडाओरड तर काही जण सौम्य आवाजात बातम्या वाचताना दिसतात. तर काही जण अडखळल्याने किंवा चुकीचा शब्द उच्चारल्याने ट्रोल होतात. मग या महिलेच्या अँकरिंगमध्ये विशेष असं काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. महिला अँकरने चेहऱ्यावर टॅटू गोंदवून अँकरिंग केल्याने एकच चर्चा रंगली आहे. काही वर्षापूर्वी जर अशा पद्धतीने अँकरिंगबाबत सांगितलं असतं, तर कदाचित ती बाब रुचली नसती. मात्र आता अशाप्रकारे अँकरिंग केल्याने चर्चा होत आहे.

न्यूझीलंडमधील एका महिला पत्रकाराने चेहऱ्यावर पारंपारिक टॅटू बनवून टीव्हीवर बातम्यांचे अँकरिंग केले आहे. असे करून महिला अँकरने इतिहास रचल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय न्यूज अँकर ओरिनी काईपाराने ओठांच्या खाली हनुवटीपर्यंत पारंपरिक टॅटू काढला आणि न्यूज अँकरिंग केली. ओरिनीने सोमवारी संध्याकाळी ६ वाजता टॅटूसह बुलेटिन वाचले.

ओरिनी यांनी सांगितले की, टॅटूमुळे मी एवढी प्रसिद्ध होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझ्यासाठी ही आनंदाची बाब असून, हे एक मोठे पाऊल आहे. अँकरिंगचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक न्यूज अँकरचे कौतुकही करत आहेत.