न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन या आई होणार आहेत. नुकतीच त्यांनी यासंदर्भातली औपचारिक घोषणा केली. देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या जसिंडा आर्डेन या सर्वात तरुण महिला पंतप्रधान आहेत. गेल्याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे स्विकारली. जून महिन्यात त्या बाळाला जन्म देतील. संपूर्ण देशवासियांसोबत त्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली.

गरोदरपणाच्या काळात मी सहा आठवडे सुट्टीवर असेन, त्या काळात उप-पंतप्रधान कार्यभार सांभाळतील. पण, मी पूर्णपणे सुट्टी घेणार नाही फोनवर मी उपलब्ध असेन असंही त्या म्हणाल्या. गर्भवती असल्याचं मला जेव्हा समजलं तेव्हा ही बातमी माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता, मी देशाची सेवा करते माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ज्या कामही करतात आणि मुलांचे उत्तम संगोपनही करतात. त्यामुळे माझ्यासाठी हे जरी मोठं आव्हान असलं तरी मी ते स्विकारलं आहे. अशीही प्रतिकिया त्यांनी दिली.

वाचा : “भारताला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसारख्या नेत्याची गरज,” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान!

२००८ साली जसिंडा या न्यूझीलंडच्या संसदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अनेक वादग्रस्त समस्यांवर जसिंडा यांनी काम केलं आहे. लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, मानवी हक्क, पर्यावरण, शांतता, महिलांचे अधिकार, समलैगिंक विवाह यासारख्या अनेक विषयांवर जसिंडा यांनी मांडलेल्या भूमिका या अत्यंत प्रभावी होत्या. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रं स्विकारली. विशेष म्हणजे त्यांना २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तरुण आणि महिला मतदारांनी त्यांना प्रचंड पाठिंबा दिला. मोफत शिक्षण, गरिबीपासून मुक्तता, महिलांची स्थिती सुधारणं, परवडणारी घरं, किमान वेतनात वाढ, देशातील सर्व नद्या सर्वांना पोहता येईल इतक्या स्वच्छ बनवणं विषमतेशी लढा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती भत्त्यात वाढ, स्थलांतरितांच्या संख्येत कपात करणं हे त्यावेळी त्यांच्या प्रचाराचं प्रमुख वैशिष्ट्य होतं.

Story img Loader