अमेरिकेतल्या वैज्ञानिकांना किरमिजी, सोनरी रंगाच्या माशाची एक प्रजाती सापडली आहे, या नव्या प्रजातीला वैज्ञानिकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव दिले आहे. प्रशांत महासागरात ३०० फूट खोल असणा-या कुरे या प्रवाळ बेटांवर माशांची ही प्रजाती आढळली आहे. पपहनौमोकुआकेआ या सागरी पट्ट्याचे संवर्धन करण्याच्या चळवळीत ओबामा यांचा सक्रिय सहभाग होता. या सागरी पट्ट्यात अनेक विलृप्त होत चाललेल्या सागरी जीवांच्या प्रजाती आहेत. जवळपास सात हजारांहूनही अधिक पाणवनस्पती, सागरी जलचरांच्या प्रजाती या पट्ट्यात आहेत. त्यातल्या अर्ध्याधिक प्रजाती या इतक्या दुर्मिळ आहेत की त्या जगाच्या पाठीवर कुठेच आढळत नाहीत. त्याचप्रमाणे दुर्मिळ प्रजातीचे कासवही येथे आढळतात. त्यामुळे या सागरीपट्टाचे संवर्धन करण्यासाठी बराक ओबामा यांनी पावले उचलली. म्हणून सन्मानार्थ वैज्ञानिकांनी या प्रजातीला बराक ओबामा यांचे नाव दिले आहे.
प्रशांत महासागरात कुरे हे कंकणाकृती प्रवाळ बेट आहे. या बेटांचा अभ्यास करत असताना वैज्ञानिकांना किरमिजी, सोनेरी रंगाचे काही मासे आढळले. हे मासे त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे यातले काही मासे त्यांनी चाचणीसाठी प्रयोगशाळेत नेले. तेव्हा ही अातापर्यंत शोध न लागलेली नवी प्रजाती असल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. जपानमध्ये आढळणा-या माशांच्या प्रजातीशी हे मासे काहीसे मिळते जुळते आहेत. या माशांवर अधिक संशोधन केले जात आहे. एखाद्या माशाला बराक ओबामांचे नाव देण्याची ही पहिलीच घटना नाही. तर याआधी म्हणजे २०१२ मध्ये देखील वैज्ञानिकांनी माशांच्या एका प्रजातीला ओबामांचे नाव दिले होते.

Story img Loader