जगभरातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत बनलेल्या सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोळ्यांच्या (Spider) विविध प्रजातींवर पीएचडी करणाऱ्या एका संशोधकाने नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या प्रजातीला सचिन तेंडुलकरचं नाव देण्यात आलं आहे.
गुजरात एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनमध्ये ज्युनिअर रिसर्चर म्हणून काम करणाऱ्या ध्रुव प्रजापतीने कोळ्यांच्या नवीन प्रजाती शोधल्या आहेत. यातील एका प्रजातीला सचिन तेंडुलकर तर दुसऱ्या प्रजातीला संत कुरियकोस इलियास चावरा यांचं नाव दिलं आहे. चावरा यांनी केरळमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
मारेंगो सचिन तेंडुलकर ही कोळ्याची प्रजाती केरळ, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रामुख्याने सापडते. २०१५ सालात ध्रुवने या प्रजातीचा शोध लावला होता. यानंतर या कोळ्यावर संधोशन आणि ओळख पटवण्याचं काम २०१७ साली पूर्ण झालं. या दोन्ही प्रजाती एशियन जम्पिंग स्पायडर्स या प्रकारातल्या असल्याचंही ध्रुवने सांगितलं आहे.