राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणादरम्यान ही भूमिका पार पाडणाऱ्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही उल्लेख केला. याच मुद्द्यावरुन राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी समाधान व्यक्त करताना अगदी अजित पवारांचे पाय पकडण्याची भाषा केलीय.
नक्की वाचा >> फडणवीसांना ‘उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या शरद पवारांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “अजित पवार…”
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडत भाषण दिलं. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना शुभेच्छा देणारं भाषण केलं. त्यानंतर अजित पवार यांनी आभार मांडणारं भाषण करताना विरोधी पक्षनेता म्हणून सक्षमपणे काम करेन असे विश्वास सभागृहातील सदस्यांना दिला. यावेळेस बोलताना अजित पवारांनी अनेक माजी विरोधीपक्षांचा उल्लेख करताना नारायण राणेंचाही उल्लेख केला.
“राणेंच्या वेळेस दरारा असायचा. त्यांनी नुसतं मागे वळून बघितलं की चिडीचूप व्हायचे शिवसेनेचे. सगळे खाली बसायचे. असला दरारा मी शिवसेनेमध्ये दुसऱ्या कुणाचा बघितला नाही. पण राणेंनी हा दबदबा स्वत: निर्माण केलेला होता,” असं अजित पवार आपल्या भाषणादरम्यान म्हणाले. अजित पवारांच्या या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मान हलवून होकार देताना दिसले. अजित पवारांच्या भाषणातील हीच क्लिप शेअर करत निलेश राणेंनी अजित पवारांचे आभार मानलेत.
“आम्हाला दुसरं काही नको. आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू,” अशा कॅप्शनहीत हात जोडणारा इमोन्जी वापरुन निलेश राणेंनी अजित पवारांनी केलेल्या राणेंच्या या उल्लेखावर प्रतिक्रिया दिलीय.
विशेष म्हणजे यापूर्वी अनेकदा निलेश राणेंनी अजित पवारांवर टीका केल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र कालच्या भाषणात अजित पवारांनी त्यांच्या वडिलांचा उल्लेख केल्याने निलेश राणेंनी अजित पवारांचे अप्रत्यक्षपणे आभार मानलेत.