रविवारी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर ‘वेस्ट इन’ हॉटेलमध्ये शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमावरुन आता भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केलीय. या कार्यक्रमातील काही फोटो शेअर करताना निलेश राणेंनी शिवसेना आणि कोकणातील राजाकरणामध्ये राणे कुटुंबियांचे राजकीय वैरी असणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
रविवारी ‘वेस्ट इन’ हॉटेलमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. आपल्याच पक्षाच्या आमदारांनी आपल्याच उमेदवारांना मते द्यावीत, यासाठी त्यांना एकत्र ठेऊन बडदास्त ठेवायची हीच आजची लोकशाही आहे, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीतही आमच्यात फूट पडू शकत नाही, हे देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे तुमचा सत्तेचा माज चालणार नाही, असा इशारा भाजपाला देत विधान परिषद निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये व्यक्त केला. याच भाषणादरम्यानची काही क्षणचित्रे ट्विटरवरुन पोस्ट करत निलेश राणेंनी शिवसेनेच्या या कार्यक्रमावर टीका केलीय.
निलेश राणे यांनी ट्विट केलेल्या चार फोटोंमध्ये उद्धव ठाकरे संवाद साधत असताना त्यांच्या मागील बाजूला मंचावर बसलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे वेगवेगळे हावभाव करत असल्याचं, हातातील घड्याळाकडे पाहत असल्याचं दिसत आहे. हेच फोटो ट्विट करत निलेश राणेंनी, “शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिवस किती उत्साहात पार पाडला बघायचं असेल तर पक्षप्रमुखाच्या मागचे बघा,” असा टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील अन्य एक संदर्भ घेत निलेश राणेंनी “मुख्यमंत्र्याने जाहीर केला ५६ चा नवीन पाढा, ५६… १५६… २५६… आहेत असे पण विचारवंत,” म्हणतही ट्विटरवरुन शिवसेनेच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील भाषणावर टीका केलीय.