पक्षात झालेलं बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. या मुलाखतीचा टीझर काल राऊत यांनी शेअर केल्यानंतर या टीझरवरुनच निलेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. निलेश राणेंनी यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये आणि सध्याच्या मुलाखतीमधील फरक दाखवणारा एक फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केलीय.
नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपावर टीका केली आहे. मात्र ही विशेष मुलाखत घेताना उद्धव ठाकरे आणि राऊत या दोघांच्या मध्ये मागील बाजूस दिसणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची फ्रेम ही राजकीय हेतूने वापरण्यात आल्याचा आरोप निलेश राणेंनी केलीय. निलेश राणेंनी यासंदर्भात ट्विटरवरुन भाष्य केलंय.
नक्की वाचा >> “शिवसैनिकांमध्येच लढाई लावून शिवसेना संपवायचा डाव आहे”; फडणवीसांसंदर्भातील त्या घटनेचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा आरोप
मागील वर्षी उद्धव यांनी अशाच प्रकारे दिलेल्या मुलाखतीमधील फोटो आणि आजच्या मुलाखतीमधील फोटो एकत्र शेअर करत निलेश यांनी दोन्ही फोटोंची तुलना केलीय. ‘इथे पण फरक’ असं म्हणत निलेश यांनी मागच्या वर्षीच्या फोटोवर ‘सत्ता होती तेव्हाची मुलाखत’ तर यंदाच्या फोटोवर ‘सत्ता गेल्यानंतरची मुलाखत’ असा मजकूर लिहिलेला आहे. या फोटोला देण्यात आलेली कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान
मागील वर्षीची मुलाखत घेताना सकाळच्या वेळेची निवड करण्यात आलेली तर यंदाची मुलाखत ही बंद खोलीत घेतल्याचं दिसत असून यावरुनच निलेश राणेंनी, “उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात,” असा टोला लगावलाय.
उद्धव ठाकरेंची ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रकाशित होणार असून आज पहिला भाग प्रकाशित झाला आहे तर उद्या म्हणजेच २७ जुलै रोजी दुसरा भाग प्रकाशित होणार आहे.