9 Years Old Insta Queen Suicide: बदलत्या काळात लहान मुलांची बदलती मानसिकता समजून घेणे हे खूप गरजेचे झाले आहे. अगदी आई वडिलांच्या लहानश्या कृतीवरूनही अनेकदा मुलं टोकाचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहात नाहीत. लहानग्यांच्या हट्टाला प्रोत्साहन देण्यासाठी वर सोशल मीडियासारखे सापळे सुद्धा आहेतच त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक बोलण्याची गरज वाढू लागली आहे. ही खबरदारी न घेतल्याने वडिलांच्या केवळ चार शब्दांवरून चिडून एका ९ वर्षीय चिमुकलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे. ही चिमुकली इन्स्टा क्वीन म्हणून प्रसिद्ध होती.
तामिळनाडूच्या तिरुवल्लुर येथील प्रतीक्षा नामक ९ वर्षीय इन्स्टा क्वीनच्या आत्महत्येने सगळेच हादरले आहेत. प्रतीक्षाचे वडील कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रतिक्षाला घराबाहेर खेळताना बघितले होते तेव्हा त्यांनी तिला खेळण्यापेक्षा घरी जाऊन अभ्यास कर असे सांगितले व तिच्या हातात घराची चावी दिली. प्रतिक्षाकडे चावी सोपवून कृष्णमूर्ती हे बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. रात्री ८ च्या आसपास जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांनी प्रतिक्षाला हाक मारली व दरवाजा उघडण्यास सांगितले मात्र त्यांना घरातून आवाज आला नाही.
खूप वेळ हाक मारल्यावर घाबरून कृष्णमूर्ती यांनी घराच्या मागची खिडकी तोडली व ते आत गेले. यावेळी समोरचे दृश्य पाहून कृष्णमूर्ती “आपल्या पायाखालची जमीन सरकली” असे वाटल्याचे सांगतात. समोर त्यांच्या ९ वर्षाच्या मुलीने म्हणजेच प्रतीक्षाने टॉवेल पंख्याला बांधून गळफास लावलेला होता. आश्चर्य म्हणजे तेव्हा प्रतिक्षाचा श्वास सुरु होता व ती सुटकेसाठी हात पाय हलवत होती. हे बघून कृष्णमूर्ती यांनी तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेले पण पोहचेपर्यंत तिने जीव गमावला होता.
हे ही वाचा<< शाकाहारी पुरुषांचा भयंकर अपमान करणाऱ्या ‘या’ तरुणीचा Video व्हायरल!
दरम्यान, या प्रकरणी सध्या पोलीस तपास सुरु आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार एखादा सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहूनच प्रतिक्षाने असे पाऊल उचलले असावे असे वाटत आहे.