अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांचा शाही विवाह सोहळा नुकताच मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात असलेल्या जिओ वर्ल्ड या ठिकाणी पार पडला. या सोहळ्याला अंबानी आणि मर्चंट कुटुंबांसह विविध सेलिब्रेटी, राजकारणी, उद्योजक अशा सगळ्यांचीच उपस्थिती होती. जस्टिन बिबर, किम कार्दशियन अशा आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचीही उपस्थिती होती. जगभरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांचा विवाह सोहळा चर्चेत राहिला. या विवाह सोहळ्यातला महत्त्वाचा विधी म्हणजे कन्यादान. राधिका मर्चंटचा कन्यादानाचा विधी होत असताना नीता अंबानी भावूक झाल्या. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्यादान संस्कार हा भावनिक करणारा विवाहसंस्कार

‘कन्यादान’ हा विधी मुलीच्या आई-वडिलांना तसंच तिच्या माहेरच्यांना भावनिक करणारा असाच आहे. मुलीची जबाबदारी जावयाच्या खांद्यावर देणारे माता -पिता साश्रू नयनांनीच हा विधी करतात असं चित्र अनेक लग्नांमधून आपण पाहिलं असेल. असाच कन्यादान सोहळा अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नातही पार पडला. त्यावेळी नीता अंबानी यांनी जे मनोगत व्यक्त करत भावना मांडल्या त्याची चर्चा होते आहे.

हे पण वाचा- “आमच्या लग्नाच्या CEO”, राधिका मर्चंटने केलं सासूबाई नीता अंबानींचं कौतुक! ईशा व श्लोकाबद्दल म्हणाली…

काय म्हणाल्या नीता अंबानी?

“आज देशातून, जगातून जे पाहुणे अनंत आणि राधिकाच्या पवित्र लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज माझ्या मन भावनांनी उचंबळून आलं आहे. राधिका आणि अनंत माझ्या काळजाचे दोन तुकडेच आहेत. आज तुम्ही विवाहबंधनात अडकत आहात याचा मला आनंद आहे. हिंदू धर्मात लग्न म्हणजे असं विवाह बंधन आहे जे सात जन्मासाठी एका बंधनात एका जोडप्याला बांधतं. सात जन्मांची साथ म्हणतात ते याचसाठी. अशी श्रद्धा आहे की जे एका जन्मात पती पत्नी असतात ते सात जन्मांसाठी एकमेकांचे होतात. विवाह संस्कारातला एक महत्वाचा संस्कार आहे तो म्हणजे कन्यादान. ” हे म्हणताना नीता अंबानींच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.

हे पण वाचा- Video: सूनबाई राधिका मर्चंटच्या विदाईत मुकेश अंबानींना अश्रू अनावर, पाहा अनंत अंबानीच्या लग्नातील भावुक व्हिडीओ

मुली म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक

पुढे नीता अंबानी म्हणाल्या, “कन्यादान हा विवाह संस्कार या गोष्टीचं प्रतीक आहे ज्यामध्ये मुलीचे आई वडील आपली कन्या आता दुसऱ्या घरात दिली जाते आहे हे अधोरेखित करतात. मात्र मी देखील एका मुलीची आई आहे, आता सासूही आहे. त्यामुळे मला हे माहीत आहे की कुठल्याही आई वडिलांना आपली मुलगी आपल्या घरातून दूर जावी असं वाटत नाही. आपल्या घरातल्या मुली या आयुष्याभरासाठीचं वरदान असतात, लक्ष्मीचं प्रतीक असतात. त्यांच्या जन्मापासूनच त्या सगळ्या घराला आनंदी करतात. एखाद्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं, तिचं असं कन्यादान कसं काय बरं करता येईल? कोणत्याही घरातली एक मुलगी असणं हा एक आशीर्वाद आहे, एक आगळावेगळा आनंद असतो. मुलगी म्हणजे आनंद, चैतन्य, सुख या सगळ्यांचं प्रतीक. हीच मुलगी जेव्हा दुसऱ्या घरात लग्न होऊन जाते तेव्हा ती ते घरही तशाच पद्धतीने फुलवते. भारताच्या संस्कृतींमध्ये हे कायमच शिकवलं जातं की ज्या घरांमध्ये मुली आहेत ते घर समृद्ध आहे. मुली या देवाने पृथ्वीवर पाठवलेल्या शक्तीचं प्रतीकच आहेत असंच मला वाटतं. स्त्री पूजनीय आहे, जननी आहे, अन्नपूर्ण आहे, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येते. त्यामुळेच आपण जमिनीचा उल्लेखही धरती माता असा करतो. नदीला आपण आईचं स्थान दिलं आहे तसंच आपल्या देशालाही आपण भारतमाता म्हणतो.” असंही नीता अंबानी म्हणाल्या.

नीता अंबानी राधिकाच्या कन्यादान सोहळ्याच्या वेळी भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. (फोटो सौजन्य-एक्स)

स्त्री ज्ञानाचा सागर आणि सरस्वती, लक्ष्मीचं रुप

“स्त्री ज्ञानचा सागर आहे, शक्तीचा स्रोत आहे, सुख आहे, शांती आहे, त्यामुळे ती सरस्वतीचं रुप आहे, लक्ष्मीचं रुप आहे. स्त्री ही अनंताची अनंत चेतना आहे. आज आपण कन्यादान सोहळ्याचे साक्षीदार आहोत. आपल्या संस्कृतीचं हे दर्शन आहे. भारतीय विवाह संस्कार हा पती आणि पत्नी यांच्यातली समानता दाखवणारा संस्कार आहे. लग्न हे दोन कुटुंबांना जवळ आणतं. कन्यादान म्हणजे असा सोहळा आहे ज्यात मुलीचे आई वडील त्यांच्या जावयाचा स्वीकार मुलगा म्हणून करतात तर मुलाचे आई वडील मुलीचा स्वीकार हा मुलगी म्हणून करतात. शैला आणि वीरेन आज तुम्ही तुमची मुलगी आम्हाला देत नाही आहात तर आज अनंत तुमच्या मुलाप्रमाणे झाला आहे, राधिका जशी आम्हाला मुलीसारखी आहे तसाच तुमच्यासाठी अनंत आहे.”

“मुकेश आणि मी तुम्हाला वचन देतो की राधिका ही आमच्या घरातल्या मुलीसारखीच असेल. इशा, अनंत, श्लोका आणि आकाश यांच्याप्रमाणेच आमचं प्रेम राधिकावरही आहे ते यापुढेही असेल. राधिका आज तुझं आम्ही खूप मनापासून स्वागत करत आहोत. तू आमच्या घरातली धाकटी सून आहेस, आजपासून तू राधिका अनंत अंबानी म्हणून ओळखली जाशील. अनंत आणि राधिकावर देवच पुष्पवृष्टी करतील असा आशीर्वाद मी देते.” असं नीता अंबानी म्हणाल्या. त्यांचं हे मनोगत चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani explains the broader significance of kanyadaan as a union where two families come together scj
Show comments