भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा मुलगा आकाश याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. मोठ्या थाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची सगळीकडेच चर्चा झाली. आकाश त्याची लहानपणीची मैत्रिण श्लोका मेहताबरोबर विवाहबंधनात अडकला. मुंबईत पार पडलेल्या या शाही लग्न सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आवर्जून उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात श्लोकाने अँटिलिया या अंबनींच्या घरात प्रवेश केला.
नीता अंबानी यांनी आपल्या सूनेला सूनमुख दर्शन म्हणून एक खास वस्तू भेट दिली आहे. वुमनसेरिया या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, नीता यांनी एक महागडा हार आपल्या सुनेला भेट दिला आहे. भेट म्हणून नीता यांनी श्लोकाला दिलेल्या या हाराची किंमत चक्क ३०० कोटी इतकी असल्याचे या वेबसाईटने म्हटले आहे. नीता यांना आपल्या सुनेला अंबानी कुटुंबियांचा पारंपारीक हिऱ्यांचा हार भेट द्यायचा होता. पिढ्यान् पिढ्या नवीन सुनेला हा हार देण्याची अंबानी कुटुंबाची प्रथा आहे. थोरल्या सुनेला मिळणारा हार तिने आपल्या सुनेला देण्याची अंबानी कुटुंबाची प्रथा असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मात्र नीता यांनी या हराऐवजी श्लोकाला ३०० कोटी रुपये किंमतीचा ‘ला इंकम्पेरेबल’ नावाचा हिऱ्यांचा हार भेट दिला. हा हार भेट मिळाल्याने श्लोका खूपच खूष झाली आहे. श्लोकाला तिची नणंद इशा पिरामल हिने आपल्या वहिनीला एक बंगला भेट दिला आहे.
सोशल मिडियावरही या हराची खूपच चर्चा आहे. आकाश आणि श्लोका यांचे लग्न ९ मार्च रोजी पार पडले. या लग्नाला सिनेसृष्टीपासून, क्रिडा जगतामधील बड्या नावांबरोबरच उद्योग श्रेत्रातील दिग्गजांचाही समावेश होता. यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, गौरी खान, करीना कपूर, मलाइका अरोरा यासारख्या बड्या नावांचा समावेश होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही पत्नी अंजलीसोबत या लग्नाला हजर होता. काही महिन्यांआधीच अंबानींची मुलगी ईशा हिचेही राजस्थानमध्ये अगदी शाही पद्धतीने लग्न झाले.