Nita Ambani on Ratan Tata :  प्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रत्येक जण त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ, संभाषणासह अनेक आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहत आहे. याचदरम्यान आता रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासह सर्व अंबानी कुटुंबीयांनी रतन टाटा यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ ऑक्टोबर रोजी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने रतन टाटा यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आणि उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी एक मिनीट मौन पाळून रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रतन टाटा यांना देशाचे महान सुपुत्र, असे संबोधण्यात आले.

काय म्हणाल्या नीता अंबानी?

या कार्यक्रमाला संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या की, “चार दिवसांपूर्वी आपण भारताचा एक महान सुपुत्र गमावला. रतन टाटा यांच्या निधनाने आम्हा सर्वांना खूप दुःख झाले. ते माझे सासरे धीरूभाई अंबानी यांचे केवळ मित्र नव्हते, तर आमच्यासाठी घरातील एका व्यक्तीप्रमाणे होते. ते नेहमीच आमच्याशी आपुलकीने वागायचे. माझा मुलगा आकाश अंबानी याचे ते गुरूही होते. आकाशाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले”. यावेळी मुकेश अंबानीदेखील खूप भावूक झाल्याचे दिसले.

Ratan Tata Lifestyle : रतन टाटा तरुणपणी कसे दिसायचे? पाहा त्यांचे ‘हे’ १० दुर्मिळ फोटो अन् त्यामागच्या आठवणी

“दु:ख ही प्रेमाची किंमत, अलविदा…”; टाटांच्या निधनानंतर त्यांच्या ३० वर्षीय मित्राची भावनिक POST

नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, “रतन टाटा एक महान व्यक्ती होते. त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय दंडगा होता. त्यांनी आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यासाठी दान केला. ज्यावेळी देशाला गरज पडली, तेव्हा रतन टाटा खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी नेहमी व्यवसायाबरोबर कर्मचारी आणि समाज यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना खूप दु:ख झाले आहे”. यावेळी कार्यक्रमात हजर असलेल्या ‘रिलायन्स’च्या हजारो कर्मचाऱ्यांनी उभे राहून रतन टाटांचे स्मरण करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

रतन टाटांचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स; मात्र ते ‘या’ एकाच अकाउंटला करत होते फॉलो

काय म्हणाले मुकेश अंबानी?

रतन टाटा यांच्या निधनाबाबत मुकेश अंबानी यांनी एक निवेदन जारी केले होते. “रतन टाटा यांच्या निधनाने मला वैयक्तिकरीत्या खूप दुःख झाले आहे. कारण- मी एक प्रिय मित्र गमावला आहे. त्यांच्याशी झालेल्या प्रत्येक भेटीने मला प्रेरणा आणि उत्साह दिला. रतन टाटा यांचे निधन हे केवळ टाटा समूहाचेच नाही, तर प्रत्येक भारतीयाचे मोठे नुकसान आहे”, असे त्यांनी त्या निवेदनात म्हटले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani on ratan tata was mentor of akash ambani reliance family tribute video viral sjr