Nita Ambani : डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा मंगळवारी रात्री पार पडला. मंगळवारी त्यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या सोहळ्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनाच्या संस्थापक, अध्यक्ष नीता अंबानी यांनी शपथविधीपूर्वी झालेल्या एका खासगी समारंभात डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं. भारत आणि अमेरिका यांचे संबंध बळकट होतील अशी अपेक्षा या दोघांनी व्यक्त केल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
नीता अंबानी यांच्या खास लूकची चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये जागतिक स्तरावरचे नेते पोहचले होते, तसंच प्रमुख उद्योगपतींचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमात नीता अंबानी यांच्या साडीने आणि खास ज्वेलरीने लक्ष वेधून घेतलं. नीता अंबानी यांनी या समारंभासाठी खास साडी नेसली होती. तसंच त्यांनी १८ व्या शतकातला नेकलेसही परिधान केला होता. हा खास हार पन्ना, रुबी आणि हिरे यांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या कँडल लाईट डिनरच्या वेळी हा नेकलेस आणि खास साडी नीता अंबानी यांनी परिधान केली होती.
नीता अंबानी यांचा रत्नहार १८ व्या शतकातला
नीता अंबानी यांचा खास नेकलेस त्यांच्या सौंदर्यात भर घालत होता. दक्षिण भारतातील कुंदन या तंत्राचा वापर करुन हा नेकलेस साकारण्यात आला आहे. यावर रुबी, पन्ना, हिरे आणि मोती जडवलेले आहेत. २०० वर्षे जुना असा मास्टरपीस असलेला हा नेकलेस लक्ष वेधून घेत होता. मुकेश अंबानीही या कँडल लाईट डिनरसाठी सुटाबुटात दिसले.
हे पण वाचा- एलॉन मस्क ते सुंदर पिचाई; जगात सर्वाधिक पगार घेणारे सीईओ कोण? अदाणी-अंबांनीनाही टाकलं मागे!
नीता अंबानींच्या साडीची खासियत काय होती?
नीता अंबानींनी या सोहळ्यात परिधान केलेली साडी कांचिपुरम सिल्क पद्धतीची होती. भारताचा कलात्मक वारसा या साडीवर विणण्यात आला होता. ही एक खास तयार करुन घेतलेली साडी होती यात शंकाच नाही. भव्य मंदिरांपासून प्रेरित असं नक्षीकाम या साडीवर होतं. १०० हून अधिक मंदिरांची नक्षी या साडीवर असल्याने या साडीचा लूक लक्ष वेधून घेत होता. ही साडी उत्कृष्ट कलाकुसरकार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते बी. कृष्णमूर्ती यांनी तयार केली होती. या साडीवर विष्णूचं वाहन असलेला वैनतेय, अमरत्वाचं प्रतीक असलेला मोर यांच्या प्रतीकात्मक प्रतिकृती नक्षीकामात दिसल्या. तसंच मनिष मल्होत्रांनी या साडीवर मॅच होईल असं मखमली ब्लाऊज डिझाईन केलं होतं. सिल्क साडीला खास अशा मण्यांची जोडही देण्यात आली होती.