उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात एका गर्भवती महिलेने वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क धावत्या बाइकवर बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. चित्रकूट जिल्ह्यातील कलवार बुजुर्ग गावात ही घटना मंगळवारी घडल्याची माहिती आहे.
मंगळवारी(दि.6) दुपारच्या सुमारास कलवार बुजुर्ग गावातील कुशल विश्वकर्मा यांच्या पत्नीला प्रसुतीकळा सुरु झाल्या. त्यावेळी टोल फ्री क्रमांक 102 आणि 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला, पण दोन तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर कुटुंबियांनी दुचाकीवरुन महिलेला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, बाइकवरुन रुग्णालयात जात असताना रुग्णालयापासून अवघ्या 40 मीटर अंतरावर असताना महिलेने बाइकवरच बाळाला जन्म दिला, आरोग्य केंद्राचे चिकित्साधिकारी डॉ. ध्रुव कुमार यांनी याबाबत माहिती दिली. सध्या आई आणि बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोघांची प्रकृती उत्तम असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘आजतक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. धावत्या बाइकवर बाळाला जन्म देताच महिलेने सोबत बसलेल्या सासूला जोरात आवाज दिला. बाइक थांबताच नवजात बाळासह ती बाइकवरुन पडल्यामुळे दोघंही किरकोळ जखमी झाल्या होत्या, असंही ‘आजतक’ने आपल्या वृत्तात म्हटलंय.
रेल्वे, बस किंवा विमानात लहान मुलांच्या जन्म झाल्याच्या बातम्या येत असतात पण धावत्या बाइकवर बाळाला जन्म दिल्याची ही घटना सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.