ओदिशामधील गंजम जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पूराच्या पाण्यामधून प्रवास करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. येथील पत्रापूर ब्लॉकमधील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज नदीपात्रामधून प्रवास करावा लागतो. केवळ एका दोरीच्या सहाय्याने ही मुलं नदी ओलांडून शाळेत जातात. नदीपात्रातून जाताना एखादी छोटीशी चूकही या मुलांच्या जीवावर बेतू शकते.
नक्की पाहा >> Video: …अन् काही क्षणांमध्ये गाडी पूराच्या पाण्यात वाहून गेली; असा मूर्खपणा कृपया करू नका
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी या मुलांना शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडायची होती. मात्र जोरदार पाऊस आणि पूरसदृश्य परिस्थितीमुळे त्यांना नदीमधून जाणं शक्य नव्हतं. सामान्यपणे रोज ही मुलं गुडघाभर पाण्यामधून नदीच्या दुसऱ्या काठावर असणाऱ्या गावातील शाळेत जातात. मात्र पूर परिस्थितीमुळे त्यांना शुक्रवारी नदी ओलांडताना अडचणी आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना नदीच्या एका काठावरुन दुसऱ्या काठावर एक दोर बांधून दिला. याच दोरखंडाच्या आधारे ही मुलं शुक्रवारी शाळेत गेली.
दरम्यान हा सारा प्रकार समोर आल्यानंतर ओदिशाचे शालेय शिक्षणमंत्री समीर राजन दास यांनी स्थानिक आमदाराबरोबरच अधिकाऱ्यांना तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. “मला या प्रकारासंदर्भात काही कल्पना नव्हती. मला हे प्रसारमाध्यमांद्वारे समजलं. मी स्थानिक आमदार आणि अधिकाऱ्यांना ही समस्या सोडवण्याचे आदेश दिलेत,” असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.
दरवर्षी पावसाळ्याच्या काळात दैनंदिन कामांसाठी जवळजवळ १५ गावांमधील लोकांना ही नदी अशाच पद्धतीने जीव धोक्यात घालून ओलांडावी लागते. गावकऱ्यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र जवळजवळ वर्ष होतं आलं तरी ही मागणी पूर्ण झालेली नसल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत धरुन नदी ओलांडावी लागत आहे.