Autorickshaw warning to passenger: ओयो हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना यापुढे प्रवेश दिला जाणार नाही, अशी बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली. ओयोने मेरठमधील संलग्न असलेल्या हॉटेलपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. ओयोची बातमी चर्चेत असताना आता एका ऑटोरिक्षातील पाटीचा फोटो व्हायरल होत आहे. एका प्रवाशाने रिक्षातील पाटीचा फोटो एक्सवर शेअर केला आहे. सदर रिक्षातील पाटी वाचून तुम्हीही रिक्षाचालकाच्या चाणाक्ष बुद्धीचे कौतुक कराल. अनया नावाच्या एका प्रवाशाने रिक्षाचालकाच्या सीटच्या मागे लावलेल्या या पाटीचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल होत आहे.
या पाटीवर ‘रोमान्स’ शब्दाचा उल्लेख करत रिक्षाचालकाने उत्साही प्रेमी युगुलांना थेट इशारा दिला आहे. पाटीच्या वरच्या भागात मोठ्या अक्षरात Warning असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. “खबरदार, इथे रोमान्स कराल तर… ही रिक्षा आहे. तुमची खासगी जागा किंवा ओयो नाही. कृपया सुरक्षित अंतर ठेवा आणि शांत बसा. आदर द्या आणि आदर मिळवा. धन्यवाद…”
हे वाचा >> HMPV म्हणजे काय? हा विषाणू किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत?
सोशल मीडियावर लोक काय म्हणाले?
सदर पाटी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. रिक्षाचालकाचे कौतुक करताना अनेकांनी त्याच्या स्पष्टवक्तेपणा आणि प्रवाशांनी शिस्तित राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तर काहींना हा इशारा मजेशीर वाटला. एका युजरने म्हटले की, रिक्षात पाटी लावण्यापर्यंत मजल गेली, म्हणजे या रिक्षात कितीवेळा असे घडत असेल?
तर काही सोशल मीडिया युजर्सनी ओयोने बदललेल्या नियमांचा हवाला दिला. ओयोनेही आता त्यांच्या हॉटेल रुममध्ये अविवाहित जोडप्यांना रोमान्स बंदी केली आहे, अशी कमेंट एकाने दिली.
दरम्यान या व्हायरल पाटीनंतर मागच्या वर्षी रिक्षात घडलेल्या एका वादाची आठवण काढली जात आहे. एका रिक्षाचालकाने प्रवाशांनी आदर द्यावा, अशी समज दिली होती. रिक्षाचालकाने लिहिलेल्या पाटीत म्हटले होते, “तुमचा अहंकार तुमच्या खिशात ठेवा. आम्हाला दाखवू नका. तुम्ही आम्हाला अधिकचे पैसे देत नाहीत. तसेच आम्हाला भैया म्हणू नका.”